छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या मालिकेतील घटना, प्रसंगे, पात्र, कथा किंवा संवाद यांसारखे अनेक घटक सामान्य प्रेक्षक स्वत:बरोबर रीलेट करतात. त्यामुळे प्रत्येक घराघरांत या मालिका खूप आवडीने पाहिल्या जातात आणि प्रेक्षकांच्या बघण्यामुळे या मालिकांना लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्याचबरोबर तंत्रज्ञदेखील मेहनत घेतात. या लोकप्रियतेवरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या टीआरपी समोर आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेले ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यासह स्टार प्रवाहच्या इतर मालिकाही टीआरपीच्या शर्यतीत पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला असून यामध्ये ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेला ६.९ रेटिंग मिळाली आहे. तर या मालिकेखाली अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘तुझेच गीत गात आहे’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘साधी माणसं’ आदी मालिका आहेत.
या मालिकांच्या खालोखाल ‘झी मराठी’च्या नव्या मालिका ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांनी जुन्या मालिकांना मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पारू’ मालिका टीआरपीच्या यादीत १५ व्या स्थानावर असून २.७ रेटिंग मिळाले आहेत. तसेच अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १९ व्या स्थानावर आहे. या मालिकेला २.४ रेटिंग मिळाले आहे.
तर याच मालिकांनंतर झी मराठीची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका २० व्या स्थानावर असून या मालिकेला २.४ रेटिंग मिळाले आहे. त्यानंतर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिका आहेत. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा टीआरपी घसरला असून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा टीआरपी स्थिर आहे.