‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरांत पाहिला जातो. याचं संपूर्ण श्रेय आदेश बांदेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच आदेश बांदेकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोहोचले. इतकंच नव्हे तर ‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ म्हणून त्यांना आज ओळखलं जातं. कित्येक कुटुंबियांच्या आनंदात आदेश बांदेकर सहभागी झाले. कधी त्यांच्याबरोबर हसले तर कधी रडले. पण या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना अनेक चढ-उतारांचाही सामना करावा लागला. याचबाबत आदेश यांनी भाष्य केलं आहे.
आदेश यांनी काही दिवसांपूर्वी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याचबरोबरीने ‘होम मिनिस्टर’चा संपूर्ण प्रवास त्यांनी सांगितला. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान प्रवास करत असताना आदेश यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. यामधीलच एका अनुभवाबाबत त्यांनी सांगितलं. त्यांचा हा अनुभव ऐकून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला.
आदेश म्हणाले, “एकदा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचं चित्रीकरण संपवून घरी निघालो होतो. सिन्नरच्या पुढे अचानक एक गाय आमच्या गाडीच्या समोर आली. आम्ही गाडी थांबवली. पाऊस प्रचंड होता. पाच ते सात मिनिटं झाली गाय बाजूलाच होईना. काही मिनिटांनी गाय थोडी बाजूला झाली. आम्ही वाट काढत पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला एक मुलगा भेटला. तो आम्हाला म्हणाला, साहेब शंकराच्या देवळात जा ना. त्या मुलाने आम्हाला असा बोलण्याचा काहीच संबंध नव्हता. पण तो मुलगा म्हणाला म्हणून आम्ही पाऊस पडत असतानाही शंकराच्या मंदिरात गेलो”.
“त्या मंदिरामध्ये आमची १५ ते २० मिनिटं गेली. आम्ही परत आमच्या मार्गाने निघालो. घोटीच्या जवळ आलो आणि घोंगडी घातलेला एक ग्रहस्थ शेतकरी गाडीच्या समोर आले. आम्हाला हात दाखवत त्यांनी गाडी थांबवली. ते मला म्हणाले, साहेब इथून गाडी पुढे नेऊ नका दुसऱ्या मार्गाने जा. मी का म्हणून विचारलं? तेव्हा ते म्हणाले, तो नदीवरचा साकव वाहून गेला आहे. तेव्हा आम्हाला असं वाटलं की, ती वीस मिनिटं आम्ही थांबलो नसतो तर आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडलं असतं”. त्यादिवशी आदेश यांना दैवी चमत्कार झाला असल्याचा अनुभव आला एवढं नक्की.