आज विजयादशमी. आजचा मुहूर्त हा शुभकार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अनेक जण आजच्या या शुभ दिनी त्यांच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा करतात. त्यामुळे सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकार मंडळीही आजच्या दिनाचे औचित्य साधत अनेक नवीन चित्रपटांची घोषणा करतात. मराठीत सध्या अनेक नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपट येत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी निर्माते व दिग्दर्शक अनेक आगळेवेगळे विषय असलेले चित्रपट घेऊन येत आहेत, त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘असंभव’… अभिनेता पुष्कर श्रोत्री या चित्रपटाचा दिग्दर्शक असून आजच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या असंभव या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Pushkar Shrotri Directed New Movie)
मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे इतरांपेक्षा नेहमीच वेगळा ठरला आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना पुष्करनं निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम करायला सुरुवात केली. गेली अनेक वर्षे पुष्कर श्रोत्री अभिनय क्षेत्रात काम करत आहे. पण मधला काही काळ पुष्कर मोठ्या पडद्यापासून दूर होता. काही दिवसांआधीच त्याचा ‘अलिबाबा आणि चाळीशीतला चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचे ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक आले. सध्या हे नाटक चांगलेच गाजत आहे.
आणखी वाचा – वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही ते फ्रीज…; सूरज चव्हाण झाला मालामाल, नामांकित कंपनीकडून भेटवस्तू
अशातच आता पुष्कर दिग्दर्शन करत असलेला नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीतील तगड्या कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे आणि अभिनेता सचित पाटील व निर्माते, दिग्दर्शक सतीश राजवाडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर चित्रपटाचे निर्माते सचित पाटील व नितीन वैद्य हे आहेत. तसंच सहनिर्माते अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई हे आहेत. पुढच्या वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या टीझरमध्ये एक मोठा वाडा असल्याचे दिसत आहे. तसंच टीझरमध्ये वाजत असलेल्या पार्श्वसंगीतावरुन हा चित्रपट हॉरर असल्याचे वाटत आहे. तसंच शेवटी ‘असंभव’ हे नाव झळकताच चाकूदेखील दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा काहीशी आगळी वेगळी असल्याचे भासत आहे. दरम्यान, ‘असंभव’ म्हणजे नेमकं काय? हे पुढच्या वर्षी कळेलच, पण तत्पूर्वी या टीझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे हे नक्की…