Suyash Tilak and Suruchi Adarkar : झी मराठीवरील काही गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘का रे दुरावा?’ ही मालिका. या मालिकेतून गाजलेली छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची अडारकर. ‘का रे दुरावा’ या मालिकेत प्रेक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा ही जोडी पाहायला मिळाली होती. या मालिकेतील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील जय व आदिती प्रेक्षकांना आपल्यामधीलच एक वाटायला लागले होते. ही मालिका संपून आज अनेक वर्ष झाली असून या मालिकेला आणि या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षक खूपच मिस करत आहेत. त्यामुळे सुयश आणि सुरुचीचे अनेक चाहते या दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त करत होते. (Suyash Tilak and Suruchi Adarkar New Play)
‘का रे दुरावा?’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर काहीच महिन्यात त्यांचं ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले. या नाटकातील त्यांची भूमिकादेखील प्रेक्षकांना भावली होती. पण आता ते कधी एकत्र काम करणार याची त्यांचे चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत होते. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे की, सुयश व सुरुची ही प्रेक्षकांची आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका नाटकातून ही जोडी एकत्र येणार असून नुकतीच या नाटकाची घोषणा करण्यात आलेली आहे. सुयश व सुरुची यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या नवीन नाटकाची घोषणा केली आहे.
सुयश व सुरुची यांच्या नवीन नाटकाचे नाव ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ असं आहे. या नाटकाचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांनी केलं आहे. तर लेखक ऋषिकांत राऊत आहेत. तसंच या नाटकाला अजित परब यांचे संगीत लाभले आहे. सुयश व सुरुची यांच्या व्यतिरिक्त या नाटकात शर्मिला शिंदे, रोहित हळदीकर, पूर्णानंद वांढेकर व शर्वरी बोरकर या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. आजच्या दसऱ्याच्या शुभदिनी या नाटकाची घोषणा करण्यात आली असून लवकरच हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. त्यामुळे अनेक चाहते या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही ते फ्रीज…; सूरज चव्हाण झाला मालामाल, नामांकित कंपनीकडून भेटवस्तू
दरम्यान, ‘का रे दुरावा’ मालिकेनंतर सुयश व सुरुची यांनी एका नाटकात एकत्र काम केले. त्यानंतर ही जोडी ‘एक घर मंतरलेले’ या मालिकेत दिसली होती. अशातच आता हे दोघे पुन्हा एकदा ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. तसंच या नाटकाची त्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या नवीन नाटकात ही जोडी आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार? याची चाहते वाट पाहत आहेत.