अंकिता लोखंडे ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमध्ये तिने अर्चना ही व्यक्तीरेखा साकारली होती. प्रेक्षकांची या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आली. काही वर्षांपूर्वी ती विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली. विकी व अंकिता हे लग्नानंतर अनेक वेळा कॅमेरासमोरही दिसून आले होते. ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वामध्ये ही जोडी अधिक प्रकाशझोतात आली होती. यामध्ये त्यांची भांडण अधिक चर्चेत राहिली. (Ankita Lokhande pregnancy)
‘बिग बॉस’मध्ये असताना विकी व अंकिता यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. घरातून बाहेर येताच दोघं घटस्फोट घेणार अशा चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगल्या. मात्र असे काहीही न होता दोघांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. आता अशातच अंकिता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता व विकीकडे गुड न्यूज असल्याचे सांगितले जात आहे. ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमादरम्यान अली गोनीच्या एका व्हिडीओमुळे या चर्चा अधिक प्रमाणात सुरू आहेत.
सोशल मीडियावर ऑफ कॅमेरा शूट झालेला व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘लाफ्टर शेफ’ची टीम निवांतपणे बसलेली दिसून येत असून थट्टा मस्करी करत आहेत. यावेळी अली अंकिता व विकीला म्हणतो की, “छोटा जैन येतोय, छोटा जैनी येतोय…”, हे ऐकल्यानंतर विकीदेखील हसताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच अंकिता गरोदर असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र यावर कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
याआधीही ‘बिग बॉस’मध्ये असताना अंकिताच्या गरोदरपणाची चर्चा रंगली होती. तेव्हा अंकिताची प्रेग्नन्सी टेस्टदेखील करण्यात आली होती. पण ती टेस्ट निगेटीव्ह आली होती. अशातच आता पुन्हा एकदा ती गरोदर असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या वृत्तामध्ये कीती तथ्य आहे याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.