‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर आली आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अरुंधती व संजना यांच्यात जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळत आहे. दोघीही एकमेकांच्या विरोधात स्पर्धेत उतरलेल्या असतात. संजना नवा डाव आखत अरुंधती कशी जिंकणार नाही यासाठी प्रयत्न करत असते. तर अरुंधती या सगळ्याचा अजिबात विचार न करता शक्कल लढवत नवनवीन पदार्थ बनवत असते. (Aai Kuthe Kay Karte Serial Troll)
अरुंधतीला या स्पर्धेत सपोर्ट करण्यासाठी मिहीर आलेला असतो. मिहीर हा उत्तम शेफ आहे. अरुंधतीच्या आयुष्यात मिहीर आल्यापासून अरुंधती थोडीफार आशुतोषच्या विचारातून सावरू लागली आहे. अनिरुद्धने आप्पा व कांचन यांना फसवून त्यांच्याकडून घराच्या कागदपत्रांवर सह्या करुन घेतलेल्या असतात. आणि त्याने सगळ्यांना घरातून बाहेर जाण्यासही सांगितलेलं असतं वा त्याबदल्यात एक रक्कम मागितलेली असते. त्यावेळी अरुंधती देशमुख कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
अरुंधती अनिरुद्धला त्याने मागितलेले सर्व पैसे परत करेन असे वचन देते. आणि त्यासाठीच ती या खास पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेत सहभागी होते. ही स्पर्धा जर अरुंधती जिंकली तर ती अनिरुद्धचे पैसे देऊ शकणार असते. त्यामुळे अरुंधती मिहीरसह या स्पर्धेत सहभागी होते. तर संजना व अनिरुद्ध अरुंधतीला हरवण्यासाठी या स्पर्धेत भाग घेतात. अरुंधतीने बनवलेला पदार्थही साऱ्यांना आवडतो. मात्र या स्पर्धेत जात्यावर धान्य दळण्यासही सांगितलं जातं. अरुंधती मिहीरसह जात्यावर दळण दळते तर संजनाची यावेळी फजिती होती.
हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. “आता हा नवीन नवरा होणार की काय”, “किती काय काय कराल आता, तिला निदान तिच्या गाण्यावर फोकस करताना दाखवा”, “म्हणजे इकडे पण हिला गाणी गाऊन अधिक अटेंशन सिक करायचं आहे”, अशा कमेंट करत भाग वाढवण्यावरुन मालिकेला ट्रोल केलं आहे.