एखादी मालिका किंवा चित्रपट हिट झाले की, त्याचे चाहते आपल्या आवडत्या मालिका किंवा चित्रपटासंबंधित अनेक गोष्टी करतात. असंच सध्या एका मालिकेबद्दल होताना पाहायला मिळत आहे आणि ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या या मालिकेची सर्वांमध्ये चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेले काही दिवस चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत असून एका चाहत्याने आपल्या मांजरांच्या पिल्लांना या मालिकेतील पात्रांची नावे दिली आहेत. मालिकेतील चैतन्यला एका चाहत्याने मॅसेज करत त्याने आपल्या मांजरांच्या पिल्लांची नावे मालिकेतील पात्रांच्या नावावरुन ठेवले असल्याचे म्हटले आहे आणि जुईनेही हा मॅसेज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.

चाहत्याच्या या मॅसेजमध्ये असं म्हटलं आहे की, “काल रात्री काहीतरी मजेदार घडले आणि मी तुम्हाला ते सांगण्यावाचून स्वत:ला रोखूशकलो नाही. शकूने (आमची मंजर) “पुन्हा” ४ लहान पिल्लांना जन्म दिला. पण मुख्य भाग म्हणजे माझी महान आई तुझ्या मालिकेत गुंतलेली आहे, म्हणून ती त्यांची नावे अर्जुन, सायली, साक्षी व चैतन्य ठेवणार आहे. हे किती आनंददायक आहे याची तुम्हाला कल्पना नाही.

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आम्ही घरातले सर्व आमच्या आईच्या विरोधात आहोत, पण तरीही माझी आई त्या पिल्लांना सायली, अर्जुन, साक्षी व चैतन्य म्हणणार आहे”. यावर चैतन्यने त्याच्या या चाहत्याला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “तुमच्या या पिल्लांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम.” तर जुईने यावर “किती भारी!, आता पिल्लांची नावेसुद्धा अर्जुन, सायली, साक्षी व चैतन्य” असं म्हणत तिची प्रतिक्रिया दिली आहे.