नुकताच ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. शिल्पा शेट्टी, सारा अली खान या बॉलिवूड सेलिब्रिटींनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर या कार्यक्रमातील अभिनेता श्रेयस तळपदेची उपस्थिती ही लक्षणीय ठरली. या पुरस्कार सोहळ्याला श्रेयस त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. यावेळी भर कार्यक्रम सोहळ्यात सूत्रसंचालक अमेय वाघने म्हटलेल्या कवितेने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही खास कविता अमेयने श्रेयससाठी म्हटली आहे. (Shreyas Talpade Emotional)
श्रेयस तळपदे खूप मोठया संकटातून वाचला आहे, एकही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. आजारपणातून बरे झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना व सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनाही दिलासा मिळाला आहे. श्रेयससाठी हा पुनर्जन्मच होता असं म्हणायला हरकत नाही. मरणातून वाचलेल्या श्रेयससाठी अमेय वाघने एक अप्रतिम कविता सादर केली. ही कविता ऐकून श्रेयस व त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. शिवाय उपस्थितांचेही डोळे पाणावले. वंदना गुप्ते यांच्याही डोळ्यात पाणी आलं कविता संपल्यावर त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवत दाद दिली.
अमेयने कविता म्हणत म्हटलं की, “संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत, हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे”.
श्रेयसच्या तब्येतीबाबत बोलायचे झालं तर, डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा खूप मोठा झटका आला. ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो लगेच घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दीप्ती त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने झटापटीने प्रसंगावधान राखल्यामुळे श्रेयसवर आलेले हे संकट दूर झाले.