कविता… अनेकांच्या अगदी काळजातला विषय. प्रत्येकाच्या मनात अनेक विचार सुरुच असतात. जो ते विचार कवितेत व्यक्त करतो तो कवी होतो. कविता ही वैयक्तिक बाब आहे. ती स्वतःसाठी लिहीलेली असते. पण त्या कवितेत साऱ्यांवर परिणाम साधण्याची शक्ती असते आणि आपल्या कवितांमधून असाच परिणाम साधण्याची शक्ती असते ती कवयित्री यांच्या कवितेत. गेली २७ वर्ष हिंदीसह मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात लेखनाची मुशाफिरी करणाऱ्या आणि १२ हजारांपेक्षा जास्त मालिकांच्या भागांचे लिखाण करणाऱ्या रोहिणी निनावे यांच्या ‘सातवा ऋतू’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले.
‘सातवा ऋतू’ हा रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. नुकतंच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कारण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी-लेखक विश्वास पाटील, कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ, अभिनेता सुबोध भावे यांची उपस्थिती लाभली. यावेळी निवेदिता सराफ यांनी रोहिनींची एक कविता सादर केली. या कवितेचे नाव होते. “आयुष्य तसं ठीक चाललंय”
आजकाल सकाळी उठल्यावर मला पाहिल्यावर आरसा हसत नाही,
नुसतं हसल्याने काय आनंद मिळत नाही, हे आता आरशालाही कळलं आहे,
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
म्हटलं तर हमसून रडावं असं काही नाही,
हिरीरीने आयुष्याला भिडावं असं काही नाही,
आयुष्यात काहीच मिळवलं नाही असंही नाही,
पण आता सुक्याबरोबर ओलंही जळलंय,
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
तशी त्याला आवडते वगैरे म्हणे मी,
करतो सोशल मीडियावर माझे स्तुती बिती,
होतात आमच्या वर्षातनं चार भेटी,
असंही नाही की मी रोज भेटत नाही म्हणून त्याचं काही बिघडलंय,
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
मी कधी कुणाच्या मागे लागत नाही,
कुणी माझ्या मागे लागलेलं मला आवडतही नाही,
पण त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे त्याने फिरत रहावं,
असं माझं आणि सुखाचं बहुदा ठरलंय,
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
तसे ओळखतात चार लोक मला,
अगदीच काही केलं नाही आयुष्यात असं नाही,
पण कुणी मागे धावत येईल,
माझ्यावर जीव ओवाळून टाकावं, तसंही नाही,
त्या चांदण्या, तो बहर, मोरपीस वगैरे,
जुन्या पुस्तकाच्या पिवळ्या पानात उरलंय,
मधाच्या फांदीवर एक स्वप्न उगवलं होतं,
ते तुझ्या वाटेवर पुरलंय,
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
काही दु:ख सांगता येत नाहीत, मनातही ठेवता येत नाहीत,
एखाद्या लव्हाळीसारखं रुतंत राहतं,
अश्वत्थामाच्या जखमेसारखं आयुष्यभर कपाळावर सलत राहतं,
कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय
बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…
आणखी वाचा – “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत…”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
निवेदिता यांनी हे कविता सादर करताच अनेकांनी त्यांच्या कविता सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच “स्त्रीच्या अंतरमनातील भावना रोहिणी खूप चांगल्या प्रकारे मांडते,” अशी भावनाही निवेदिता यांनी व्यक्त केली.