काही वर्षांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आयर्न खान सापडला होता. या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्याच नेतृत्त्वात एनसीबीच्या कारवाया सुरू होत्या. पण यानंतर वानखेडे विविध वादांमध्ये सापडले. अशातच आता समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
समीर वानखेडे यांनी नुकतीच लल्लन टॉपला मुलाखत दिली. मात्र, प्रकरण सध्या न्यायालयामध्ये असल्याने त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. पण तरीही वानखेडेंनी वानखेडे यांनी १७ लाख ४० हजार रुपये किमतीचे रोलेक्स घड्याळ घातल्याच्या आरोपावर, शाहरुख खानकडून आलेली रिक्वेस्ट, याशिवाय रिया चक्रवर्तीसह अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्याबाबत आपले मत व्यक्त केले.
ऑक्टोबर २०२१मध्ये, एनसीबीने एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखने स्वतः वानखेडेंना विनंती केली होती. याबद्दल वानखेडे असं म्हणाले की, “मी त्याच्याबद्दल (शाहरुख खान) बोलणार नाही. पण जेव्हा आपण ड्रग्ज प्रकरणी एखाद्यावर कारवाई करतो, तेव्हा त्याच्या आई-वडिलांचे आणि नातेवाईकांविषयी मला वाईट वाटते. विशेषत: जर त्या व्यक्तीने ड्रग्ज घेतले किंवा त्याचे व्यसन केले असेल”.
यापुढे एका प्रसिद्ध कलाकारांना चौकशीसाठी बोलावल्याच्या प्रश्नावर वानखेडेंनी असं म्हटलं की, “माझ्यासाठी कुणीही सेलिब्रिटी नाही. माझ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच सेलिब्रिटी आहेत. यापुढे ते असं म्हणाले की, “कलाकारांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने मीडियाने या चौकशीला ‘हायप्रोफाईल केस’ म्हटले गेले. पण फक्त मीडियासाठी किंवा इतर लोकांसाठी हायप्रोफाइल आहे. माझ्यासाठी ते माझ्या आयुष्यातील सर्वात लहान प्रकरणांपैकी एक आहे”.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे हे नाव चांगलंच लोकप्रिय झालं होतं. अशातच आता समीर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांवर स्वत:ची मतं परखडपणे व्यक्त केली आहेत.