‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी मोठी घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक सराफ यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला आहे. मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं यासाठी प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे व अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि. (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालय’ ॲप सादर केलं आहे.
यावेळी निवेदन करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा ‘चंकु’ या टोपण नावाने उल्लेख केला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संकर्षणला कोपरखळी देत असं म्हटलं की, “संकर्षण जी, त्यादिवशी नाट्यसंमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की, आपल्या लोकांचा आदर आपणच केला पाहिजे. तर चंकू सर असं काही नसतं. त्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर असतं हे मी समजू शकतो. मुळात या गोष्टी आपण यापुढे सुधारल्या पाहिजे. माझ्याकडे काही दिवसांपूर्वी श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी मला सांगितलं की, मी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो. तिथे मी सांगितल की, मला आनंद रावांची दोन आमलेट द्या. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर पूर्ण नावच बोलायला लागणार. कोण कसं काय समजेल सांगू शकत नाही”.
यानंतर राज ठाकरे यांचं भाषण संपताच संकर्षणने स्टेजवरच म्हटलं की, “मी मुंबईमध्ये आल्यापासून सगळ्यांना सर म्हणत आलो आहे. पण आज मलाच कानपिचकी मिळाली की, चंदू सर असं काही नसतं. पण चंद्रकांत कुलकर्णी सर आजपासून आम्ही तुम्हाला चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणू”.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाट्यसंमेलनामध्ये राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांना टोपणनावाने नाही तर त्यांना आदराने हाक मारली पाहिजे असं म्हणत मराठी कलाकारांचा खरपूस समाचार घेतला होता. यावर आता ‘तिकिटालय’ ॲपच्या शुभारंभाच्या या सोहळ्यातदेखील राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी कलाकारांनी एकमेकांना आदर देण्याबद्दल आठवण करून दिली आहे.