मराठी मनोरंजन सृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आपल्या अभिनय, सौंदर्य व उत्तम नृत्यकौशल्याने सोनालीने मराठी मनोरंजन विश्वात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मराठीसह इतर भाषांतही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी, हिंदी भाषांत काम केल्यानंतर सोनाली आता दक्षिण सिनेसृष्टीकडे वळली आहे. नुकताच सोनालीचा ‘मलाइकोट्टाई वालीबान’ या मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याच चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने नुकताच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या नवऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सोनालीने तिचा नवरा कुणाल हा लॉस अॅडजस्टरचे काम करत असल्याचे सांगितले. सोनालीने “कुणाल हा लॉस अॅडजस्टर आहे” असं म्हणताच त्यावर सिद्धार्थ पुन्हा तिला “ते काय असतं? असं विचारतो. यावर सोनाली त्याला उत्तर देत असं म्हणते की, “तो एखाद्या कंपनीमध्ये झालेला तोटा शोधण्याचे, त्यावर संशोधन करण्याचे काम करतो. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे किंवा बँकांमध्ये काही तोटे होतात ते तोटे शोधण्याचं काम तो करतो. जेव्हा एखाद्या बँकेत फ्रॉड होतो, तेव्हा ते इन्शुरन्स कंपनीकडे जातात आणि ती इन्शुरन्स कंपनी यांच्या एजन्सीला तो तोटा शोधून काढण्यासाठी काम देते”.
यापुढे ती असं म्हणाली की, “तो खूप हुशार आहे. तो सध्या दुबईला राहतो. पण तो मूळचा युकेचा आहे. त्याला माझ्या असण्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. आजही तो या सगळ्या मनोरंजन जगापासून दूर आहे. त्याला या क्षेत्राशी फार काही घेणंदेणं नाही. पण हो तो माझ्या कामाची प्रशंसा करतो. मला प्रोत्साहनही देतो आणि त्याचा मला पाठिंबाही आहे”.
दरम्यान, सोनालीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांनीही तितकाच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच आगामी काळात तिचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेकांना तिच्या या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.