‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमुळे सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असते. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले असून आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. नुकतीच तिने ‘बिग बॉस’मधील शर्मिष्ठा राऊत व मेघा धाडे या खास मैत्रिणींची भेट घेतली याचा एक खास व्हिडीओही तिने शेअर केला होता.
अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यादरम्यान अभिनेत्रीला तिच्या शारीरिक बदलांवरुन काही लोकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर सईने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या.”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. जिथे तुमच्या शरीराचे ६ थर कापले जातात. या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, काहीही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही. एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि याकाळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे”.
तर यापुढे सईने असं म्हटलं आहे की, “या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले. पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, आदराने, दयाळू राहिले, तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.”