Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : सिनेसृष्टीतून एकामागोमाग एक वाईट बातम्या समोर येत आहेत. अशातच सिनेसृष्टीला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. कलाक्षेत्रातील संगीतविश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे. पद्मश्री, ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, ते गेली अनेक दिवस आजारी होते. आजारपणामुळे त्यांचं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता त्यांचं निधन झालं. रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते, असंही समोर आलं.
पंकज उधास यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृतरीत्या सांगितली गेली. त्यांच्या कुटुंबियांकडून निधनाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली. यात त्यांनी लिहिलं आहे की, “अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार”, असं लिहित त्यांनी ही पोस्ट शेअर केली. यानंतर सिनेसृष्टीतून व चाहते मंडळींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंकज उधास यांच्या निधनाची बातमी त्यांची लेक नायब उधास हिने दिली. पंकज उधास यांना रेवा व नायब अशा दोन मुली आहेत. वडिलांच्या निधनांनंतर दोघीही खचल्या आहेत. काही वेळापूर्वीच पंकज उधास यांचे पार्थिव घरी आणण्यात आले, तेव्हा वडिलांचे पार्थिव पाहून त्यांच्या मुलींना अश्रू अनावर झाले. त्यांच्या मुली रडताना दिसल्या. दरम्यान, या आलेल्या धक्क्यातून दोघींनी स्वतःला सांभाळत परिस्थिती सांभाळताना दिसल्या.
‘चिठ्ठी आई है’, ‘ना कजरे की धार’, ‘चांदी जैसा रंग’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ यांसारख्या अनेक गाण्यांमधून लोकप्रियता मिळवली. २००६ मध्ये पंकज यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. पंकज यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया उमटत आहेत. संगीत क्षेत्राबरोबरचं बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.