शनिवार १७ फेब्रुवारी रोजी ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूच्या अचानक आलेल्या वृत्ताने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार सुरु होते. यावेळी तिने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. या उपचारादरम्यान तिच्या शरीरात द्रवपदार्थ तयार होऊ लागले, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.
सुहानीच्या निधनाचे वृत्त येताच मनोरंजन सृष्टीतून अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले. अशातच काल (१८ फेब्रुवारी) रोजी अभिनेत्रीची आई-वडिलांनीदेखील त्यांची प्रतिक्रिया दिली. सुहानीला ‘डर्माटोमायोसिटिस’ हा दुर्मिळ आजार झाला असून तिला स्टिरॉइड्स देण्यात आले होते. मात्र या स्टिरॉइड्सने तिची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली. तिला या स्टिरॉइड्समुळे श्वसनाचा व फुफ्फुसाचा त्रास होऊ लागला आणि अखेर १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तिचे निधन झाले.
अशातच सुहानीच्या आईने नुकतीच एक मुलाखत दिली, या मुलाखतीत आमिर खान हा कायम सुहानीच्या संपर्कात राहत असे व तो तिच्याबद्दल कायमच विचारपूस करत असल्याचे म्हटले. यावेळी सुहानीच्या आईने आमिरविषयी गौरवोद्गार काढत असं म्हटलं की, “आमिर सर आमच्या संपर्कात आहेत. ते खूप चांगले व्यक्ती असून ‘दंगल’ चित्रपटानंतरही ते कायम सुहानीच्या संपर्कात राहायचे. सुहानीविषयी ते कायम विचारपुस करत असत.”
यापुढे सुहानीच्या आईने असं म्हटलं की, “आम्ही त्यांना सुहानीच्या आजाराबद्दल सांगितले नाही, कारण आम्ही स्वत: खूप काळजीत होतो. त्यामुळे आम्ही कोणालाच काहीच सांगितले नाही. आमिर खान यांना एखादी गोष्ट सांगितल्यास ते त्वरित प्रतिसाद देतात आणि आम्हाला वैयक्तिकरित्या कॉल करतात. त्यांनी सुहानीला कधीच एकटे सोडले नव्हते. त्यांच्या मुलीच्या (आयराच्या) लग्नासाठीही त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते आणि लग्नाला उपस्थित राहण्यास सांगितले होते.”
आणखी वाचा – Video : ‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीचा शाही विवाहसोहळा संपन्न, लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सुहानीच्या निधनाचे वृत्त कळताच कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी व तिच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. आमिर खाननेदेखील सुहानीच्या निधनावर ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले होते.