मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत आपलं परखड मत व्यक्त करताना दिसतात. त्यांना न पटलेले मुद्दे, सार्वजनिक होणारा त्रास असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर मराठी कलाकार संपत प्रतिक्रिया देताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या एका सामाजिक मुद्द्यांवरील भाष्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडबोले. (Mugdha Godbole Post)
मुग्धाने याआधी अनेक मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांच्या लेखनाची जबाबदारीही तिने सांभाळली आहे. अशातच मराठी मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने त्या राहत असलेल्या परिसरातील एक व्हिडीओ फेबसबुकवरुन पोस्ट करत प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी या पोस्टवरुन तिला सल्ला दिलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीने तिच्या फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “रोज सकाळी आमच्या आजूबाजूला कचरा जाळतात. कित्येक तास तो धूर नाकात, घशात जाणवत राहतो. अनेक सोसायट्याच कचरा उचलणाऱ्या माणसांना ‘इथेच जाळून टाका ‘ असं सांगतात म्हणे. म्हणजे आता याबद्दलही तक्रार करणं आलं. पण हा काय आळस आहे? का दुर्लक्ष, का कामचुकारपणा? आणि असला तर कुणाचा?”, असा प्रश्न तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला.
यानंतर अभिनेत्रीने पुन्हा यावर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “याचविषयी काल लिहिलं होतं. मी या लोकांना पोलिसांत तक्रार करेन असं म्हणाले आहे, यावर यांचं म्हणणं आहे की, पालापाचोळा उचलायला एवढ्या आत गाडी येत नाही. आम्हाला पायी चालत लांबवर हे न्यावं लागतं. यावर काय उपाय असतो? या बायकांची दयाही येते. पण त्या जे करत आहेत तेही चुकीचं आहे”, असंही तिने म्हटलं आहे.