मराठी सिनेसृष्टीतील देखणे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी यांच्या सौंदर्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै २०२३ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या तब्बल सहा महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं. या पुस्तकात रवींद्र महाजनी यांनी त्यांच्या पत्नीवर संशय घेत, त्यांना मारहाण केली असल्याचा खुलासा केला. माधवी महाजनी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. (Ravindra Mahajani Incident)
हा किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “एकदा मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी वरच्या मजल्याच्या आमच्या बेडरुममधून गप्पा मारत होते. जुन्या आठवणी निघाल्या तेव्हा तिने जरा चेष्टेतच विचारले की, ‘काय गं, अजून आठवतो का तो आपल्या शाळेतला मुलगा. त्याने तुला प्रपोज केलं होतं. तुलापण तो बऱ्यापैकी आवडला होता.’ तेव्हा मी तिला हसून म्हटलं की, ‘हो, येते कधी कधी त्याची आठवण. जुन्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या की विषय निघतो.’ हे सारं मी फोनवरुन बोलत असताना माझी मुलगी रश्मी खालून वर आली आणि म्हणाली, ‘आई, तू काय बोलतेयस फोनवर? बाबा अगदी कान लावून खालच्या फोनवरुन ऐकत आहेत.’ ती असं म्हणाली तरी मला काही त्यात विशेष वाटलं नाही. शाळकरी वयातली ती गोष्ट निघाली त्या निमित्ताने मी बोलले इतकंच”.
पुढे त्यांनी हा किस्सा सांगत म्हटलं की, “नंतर माझ्या लक्षात आलं की, ती इतकीशी गोष्टसुद्धा रवीला सहन झाली नाही. तो स्वतःच्या देखणेपणावर अत्यंत खुश होता. अनेक स्त्रियांकडून त्याला त्याचं ऍप्रिसिएशन मिळत होतं. चक्क हीरोच होता तो आणि मी? मी तर त्याच्या दृष्टीनं अगदीच सामान्य होते. त्याच्यावरुन जीव ओवाळून टाकणारी, त्याचे सारे गुन्हे माफ करुन त्याच्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करणारी. दुसरं कुणी मला आवडणं वगैरे शक्य नाही. हे काय भलतंच ? कधीकाळी का होईना, पण कोण मुलगा हिच्या संपर्कात आला होता? हे कळल्यापासून त्याचं बिनसल्याचं माझ्या लक्षात आलं. तसाही तो फार लवकर रागवत असे. पण त्यानंतर त्याने अंगावर हात टाकायला सुरुवात केली.”
रवींद्र यांच्या रागाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “कधीकधी तर इतकं चिडायचा की स्वतःचेच केस उपटायचा. मला म्हणायचा, ‘तो कोण आहे? कुठं असतो ते सांग मला.’ आणि म्हणायचा, ‘त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो.’ पण मला कळलं होतं, कशात काही नसताना तो चांगलाच दुखावला होता. इतक्या शुल्लक गोष्टीला तो इतकं महत्त्व देईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. पण त्याचा इगो दुखावला होता एवढं खरं. त्याचा तोल कशावरून जाईल सांगता येत नसे. त्याचे मूड सतत बदलत असायचे. खदखदून हसणारा रवी पुढच्या अर्ध्या तासानंतर माझ्या अंगावर धावून येई.”
एक किस्सा सांगत त्या पुढे म्हणाल्या, “एकदा आम्हाला माझ्या नणंदेकडे जायचे होते. आम्ही खाली डायनिंग रुममधे गेलो. साबुदाण्याची खिचडी खाल्ली. वरती येऊन तयार होण्यासाठी तो डोक्यातून शर्ट काढत होता. त्याला निघेना. मी पुढे झाले. बरीच झटापट करुन तो शर्ट एकदाचा अंगातून निघाला. आम्ही दोघेही त्या वेळी हसत होतो. त्यानंतर काही काळ तो गप्प झाला. मग त्यानं अचानक माझे केस धरून जोरात ओढले. असह्य वेदना झाल्या. तो ओरडला, ‘काय घातलं होतंस खिचडीत? शर्ट का नव्हता काढता येत मला? तुला काय वाटलं? मी म्हातारा नाही झालो’ तो अशीच बडबड करीत असताना आम्ही निघालो.”
पुढे त्यांनी असंही लिहिलं आहे की, “गश्मीरच्या मुंजीचं आमंत्रण द्यायला मुंबईला निघालो होतो. खरं तर आनंदाचा प्रसंग पण त्याचा मूड आता गेलेला होता. समजूत काढण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. आत्ताच तर आपण चांगल्या मूडमधे होतो. अचानक काय झालं तुला? आपण दोघेही आता हसत होतो असं आठवून दिलं. पण त्याचा संताप अनावर झाला होता. गाडी थांबवून मला तो गाडीतच मारू लागला. तो एवढा आडदांड. त्याच्यापुढे मी अगदीच बारकुळी. मी मार खात राहिले. त्यानंतर तो अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला. अखेरीस मला सारं असह्य होऊन मी म्हटलं, ‘मी उतरते इथे. गाडी थांबव.’ त्यानं ताबडतोब गाडी थांबवली. रात्रीचे साडेअकरा-बारा वाजले होते. त्याला क्षणभरही वाटलं नाही की, इतक्या रात्री ही एकटी कुठे जाईल? कशी जाईल? मी गाडीतून उतरताच तो गाडी पुढे घेऊन गेला.”
पुढे त्या म्हणाल्या, “दुखऱ्या मनानं रस्त्यावर उतरल्यावर मी आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर नाव होतं, ‘ह.रा. महाजनी मार्ग’ कालगती पाहा. ह. रा. महाजनी माझे सासरे. अशा सुसंस्कृत, स्त्रियांच्या बाबतीत इतका सुधारणावादी असलेल्या विद्वान माणसाच्या मुलाने आपल्या बायकोला बेदम मारलं होत आणि अपरात्री तिला एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून तो निघून गेला होता. हातात काही पैसे नाहीत. दुखलेल्या शरीरानं आणि दुखावलेल्या मनानं मी वांद्रयाच्या दिशेनं चालत राहिले. रात्री कधीतरी नणंदेकडे पोहोचले. रवी त्यांच्याकडे अर्थातच पुष्कळ आधी पोहोचला होता आणि गाढ झोपला होता. सासरचे सर्वजण मला समजून घेत होते. माझ्याशी नेहमी ते चांगलेच वागले. हे सारं अशा प्रकारे पहिल्यांदाच घडलं. तोपर्यंत त्यानं माझ्यावर कधीही हात टाकला नव्हता. कधी वाईट बोलला असंही नाही. पण ही त्याच्या पुढच्या वाईट वागण्याची सुरुवात होती असं आता वाटतं.”