बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया बच्चन यांची मुलं श्वेता बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत. दोघांचेही भावा-बहिणीचे नातं हे सर्वांसमोर आहेच. श्वेता व अभिषेक यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेमही आहे. माध्यमांसमोर किंवा मुलाखतीदरम्यान अनेकदा श्वेता आपल्या लहानपणीचे, आई-वडिलांबरोबरचे किंवा अभिषेकसह झालेले किस्से शेअर करत असते. अशातच श्वेताची मुलगी नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये श्वेताने अभिषेक व तिच्यामधील जबरदस्त भांडणाचा किस्सा सांगितला आहे. या भांडणांमध्ये श्वेताला तिचे केस गमवावे लागले होते. हा किस्सा सांगताना श्वेताला हसू आवरत नव्हते. (Shweta Bachchan on abhishek bachchan)
अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल’ शोमध्ये तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये श्वेताने तिच्या व अभिषेकमध्ये होणाऱ्या भांडणांचे मजेदार किस्से शेअर केले. एक किस्सा शेअर करताना ती म्हणाली की, “आई-बाबा बाहेर गेल्यामुळे अभिषेक व मी एकटेच घरी होतो. आमच्यामध्ये दरवेळी भांडणं असायचीच. पण त्यादिवशी आमच्यात भांडणं झाली आणि माहिती नाही कुठून पण अभिषेकला कैची सापडली. त्याने माझे केस मधोमध पकडले आणि कापून टाकले”. हा किस्सा सांगताना श्वेताला खूप हसू येत होते. हा किस्सा ऐकून जया बच्चन यांनादेखील किस्सा आठवला आणि त्यादेखील हसू लागल्या.
श्वेताने हा किस्सा सांगितल्यानंतर नव्या नवेलीनेदेखील आजीबरोबरचा एक प्रसंग सांगितला. नव्या म्हणाली की, “मी लहान असताना शाळेत जायचे त्यावेळी दोन वेण्या घालाव्या लागत असत. वेण्या घालताना मी जराही हलले तरीही आजी मला कंगव्याने मारत असे”. बच्चन कुटुंबातील असे गमतीशीर किस्से नव्याच्या शोमधून समोर आले आहेत.
प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवरदेखील काही महिन्यांपूर्वी जया अमिताभ यांना वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी अभिषेकसह आल्या होत्या. त्यावेळी आईचा घरी किती दरारा आहे आणि अमिताभ आईसमोर कसे शांत बसतात हे मजेशीर पद्धतीने सांगितले होते. अमिताभ हे त्यांच्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवतात. कुटुंबाप्रती असलेलं त्यांचं प्रेम नेहमी दिसून येते.