बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याची लेक आयरा खानच्या लग्नामध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळाला. यानंतर आता आमिर खानच्या मुलाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमधून तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसह दिसून येत आहे. जुनैद हा ‘महाराज’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार असून २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच जुनैदच्या दुसऱ्या चित्रपटाची देखील चर्चा सुरु आहे. (junaid khan bollywood first movie)
आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सिद्धार्थ पी मल्होत्रा व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘महाराज’ या चित्रपटाची निर्मिती होत असून या चित्रपटाचा सेट जपान येथील साप्पोरो स्नो फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आला आहे. या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी देखील दिसत आहे. या चित्रपटामध्ये जुनैद व साई पल्लवी आपल्याला रोमान्स करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण १ डिसेंबरपासून सुरु झाले असून या चित्रपटाचा काही भाग मुंबईमध्ये चित्रित करण्यात आला आहे. जपानमध्ये सध्या ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे त्या ठिकाणी बर्फ पडत असल्याने चित्रीकरण लांबणीवर पडले आहे. जुनैद व साई पल्लवी ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाबद्दल उत्सुकता देखील दर्शवली जात आहे.
जुनैद खानचा हा पहिला चित्रपट असून हा चित्रपट ऐतिहासिक महाकाव्यावर बेतलेला असल्याचे समोर आलं आहे. जुनैदने या आधी ७ वर्ष रंगभूमीवर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बॉलिवूडमध्ये जुनैदच्या नावाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून तो नावारूपास येईल असा विश्वास अनेकांना आहे. पण आपल्या अभिनयाने जुनैद प्रेक्षकांची मने जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.