येत्या दिवसांत ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. आगामी काही दिवसांत ओटीटीवर सस्पेन्स, थ्रीलर अन् क्राईमने परिपूर्ण चित्रपट व सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून घेऊयात, येत्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट व सीरिजबद्दल…

हनुमान : हा चित्रपट भगवान हनुमानाच्या विलक्षण शक्ती प्राप्त होणाऱ्या एका तरुणाभोवती फिरते आणि हा चित्रपट अंजनादरी नावाच्या काल्पनिक गावात बेतलेला आहे. अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांसारख्या इतर अनेक कलाकारांसह तेजा सज्जा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. काही रिपोर्टसनुसार, हनुमानचे ओटीटी अधिकार झी-५ ओटीटी माध्यमाने विकत घेतले असून या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात जवळपास २९० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे

मार्वेल्स : मार्वेल्स हा अमेरिकन सुपरहिरोवर आधारित चित्रपट आहे. जो गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ब्री लार्सन, टेयोनाह पॅरिस, इमान वेल्लानी आणि झ्वे ॲश्टन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशातच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

आर्या ३ : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज ‘आर्या’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही वेबसीरिज हिट ठरल्यानंतर त्याचा पुढचा भाग ‘आर्या-२’देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. अशातच आता ‘आर्या-२’चा पुढचा सीझन म्हणजेच ‘आर्या-३ अंतिम वार’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला डिज्नी+हॉटस्टारवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता व्यतिरिक्त या चित्रपटात इला अरुण, सिकंदर खेर, विकास कुमार, इंद्रनील सेनगुप्ता, माया सराव, गीतांजली कुलकर्णी, वीरेन वझिरानी आणि विश्वजीत प्रधान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

भक्षक : अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला ‘भक्षक’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर ही पत्रकार वैशाली सिंहच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘सीआयडी’ फेम अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे. तर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असही म्हटलं जात आहे. भूमीचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

गुंटूर कारम : महेश बाबूची मुख्य भूमिका असलेला गुंटूर कारम हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम तसेच कन्नड अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गुंटूर कारमचे दिग्दर्शन त्रिविक्रम यांनी केले आहे आणि त्यात रम्या कृष्णा, प्रकाश राव, श्री लीला, जयराम, वेनेला किशोर, ईश्वरी राव आणि राव रमेश यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शन होणार आहे.