‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अंकिताने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. दोघांचाही खेळ प्रेक्षकांना विशेष भावला. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून दोघांमध्ये बरेचदा भांडणंही झालेली पाहायला मिळाली. त्यामुळेच अंकिता व विकी जैन चर्चेत आले. त्यानंतर दोघांमधील भांडणं पाहता अंकिताच्या सासूबाईंनी अंकिताला खडेबोल सुनावले. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही अंकिताच्या सासूबाईंनी सूनेवर बरेच आरोप-प्रत्यारोप केले. (Ankita Lokhande On Her Mother In Law)
‘Galatta इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताला तिच्या सासूच्या वागणूकीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा तिने पहिल्यांदाच उघडपणाने भाष्य केलं. ती म्हणाली, “जेव्हा आई (सासू) पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आल्या तेव्हा विकी खूप रडत होता. आईने विकीला कधीच रडताना पाहिलं नाही. तो रडत आहे हे पाहून आईला वाईट वाटलं. कुठे ना कुठे त्या माझ्यासारख्या आहेत असं मला वाटतं. जर भविष्यामध्ये माझं मुल असेल आणि तो रडत असेल तर माझीही तशीच प्रतिक्रिया असेल. त्याक्षणी फक्त त्यांना जे वाटलं ते त्यांनी सगळ्यांसमोर मांडलं”.
अंकिता पुढे म्हणाली, “मी सगळ्या गोष्टी समजते. त्या माझ्यासारख्या आहेत. पण मनात त्यांचं तसं काहीच नसतं. तेव्हाही मला हसायला आलं होतं. कारण त्यांचा स्वभाव मला माहित होता. त्यांना त्यांच्या मुलासाठी अधिक वाटतं आणि ते माझ्यासाठी ठिक आहे. माझ्या आईचंही बहुतेक तसंच असेल. पण माझी आई विकी व माझ्याबरोबर राहिली आहे. त्यामुळे ती आम्हा दोघांनाही अधिक ओळखते. पण विकीची आई माझ्याबरोबर कधी राहिलीच नाही. ती आमच्याकडे येऊन राहिली नाही. ती तिच्या मुलीबरोबर राहते. त्यामुळे विकी व माझ्या नात्याबाबत जाणून घेण्याची त्यांना कधी संधी मिळाली नाही. त्या त्यांच्या मुलावर इतकं प्रेम करतात की, त्यांना घरात घडत असलेल्या गोष्टी खूप मोठ्या वाटल्या.
यापुढे ती असंही म्हणाली की, “घरामधून जेव्हा मी बाहेर आली तेव्हा मी त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यामध्ये फक्त प्रेम होतं. त्या माझ्या सासूबाई आहेत. आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. जे आहे ते तोंडावर बोलायचं आणि विषय बंद करायचा. शो संपल्यानंतर मी त्यांना भेटले. पण त्यांच्या मनात असं काहीच नाही. मी या सगळ्या गोष्टींबाबत स्पष्टीकरण देत नाही. नाती खूप महत्त्वाची असतात. माझ्यासाठी माझे सासू-सासरे आणि संपूर्ण कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. आमची भांडणंही कुटुंबासाठी होतात. जर आम्ही कुटुंबच सांभाळू शकत नाही तर आमचं नातंही आम्ही कधीच सांभाळू शकत नाही.
सासू-सासऱ्यांच कौतुक करत अभिनेत्री म्हणाली, “नारळ वरतून कठोर पण आतून एकदम मस्त असतो तसंच माझ्या सासू-सासऱ्यांचं आहे. त्यासाठी मी त्यांचा आदर करते. मी माझ्या सासऱ्यांशीही बोलले आहे. आता मी बिलासपूरलाही जाणार आहे. तिथे आमच्या अधिक गप्पा होतील. विकीवर आणि माझ्यावरही ते नाराज होते. पण बिलासपूरला आल्यावर आपण बोलू असं त्यांनी सांगितलं आहे”.