मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. गेल्यावर्षी १५ जुलै रोजी रवींद्र महाजनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर सर्वांनी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला जबाबदार धरले. कारण मृत्यूवेळी रवींद्र यांच्या कुटुंबीयांतील एकही व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हती. याउलट मृत्यूपूर्वी बरेच दिवस रवींद्र महाजनी एकटेच राहत होते. रवींद्र यांच्या मृत्यूनंतर सहा एक महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचं चौथा अंक पुस्तक प्रकाशित केलं. (Gashmeer Mahajani Incident)
या पुस्तकात माधवी यांनी आयुष्यातील चढ-उतार, चांगल्या-वाईट आठवणी शेअर केल्या आहेत. नुकताच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. या पुस्तकात वडिलांच्या निधनादरम्यान घरात घडलेला एक प्रसंग गश्मीरने प्रस्तावनेतून सांगितला आहे. गश्मीरने लिहिलं आहे की, ” १२ जुलै २०२३. मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा. पण वास कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरुन पडला नाही ना म्हणून मी व माझ्या बायकोने संपूर्ण वॉर्डरोब हुडकला पण काहीच सापडले नाही. दुपारी आई, मी, गौरी व ४ वर्षांचा माझा मुलगा व्योम एकत्रच जेवलो. व्योमच्या माकड चेष्टा व एकमेकांची मजा मस्करी सुरुच होती. भाजी, भाकरी, साधं वरण असं घरचे सात्विक जेवण जेवल्यानंतर अचानक आईला उलट्या सुरु झाल्या”.
गश्मीरने पुढे लिहिलं, “यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लो होऊन कोसळली होती. त्यात बोटाला जखम झाली होती आणि डाव्या हाताची तर्जनी पस धरुन पायाच्या अंगठ्या एवढी सुजली होती. शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणयचं आणि जातीने लक्ष घालून तिला बरं करायचं. मुंबईत नवीन डॉक्टर्सला दाखवले.महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली. सगळ्या टेस्टस् नॉर्मल आल्या होत्या. औषधे सुरु होती. खाण्याची पथ्ये चोख पाळली जात होती. तरीही आता उलट्या का सुरु व्हाव्यात, मला काहीच कळेना. आज आराम करुन बरं नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जायचं, म्हणून मी अपॉईंटमेंट घेऊन ठेवली”.
पुढे गश्मीरने लिहिलं आहे की, “रात्री १० वाजता झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रुममध्ये गेलो. वॉर्डरोबमधून अजूनही कुजका वास येतच होता. दुसऱ्या दिवशी मी आईला घेऊन डॉक्टरकडे गेलो. उलट्या कमी झाल्या होत्या पण पोटातील आतडी पार पिळवटून निघाली होती. तिची ही अवस्था पाहून डॉक्टरदेखील चक्रावून गेले. त्यानी एक गोळी लिहून दिली आणि दोन दिवस घरी आराम करण्याचा सल्ला दिला. आईला घरी आणून सोडले आणि अंघोळ करुन मी एका मिटिंगकरता निघालो. जाता जाता गौरीने औषधांचं प्रिस्क्रिपशन घ्यायला सांगितलं. मी, “ते मी बघतो. तू आधी त्या वॉर्डरोबमधल्या कुजकट वासाचं काहीतरी कर!”… “अरे कसला वास!” ती वैतागून म्हणाली. त्यावेळी लक्षात आलं की गेले दोन दिवस तो वास फक्त मलाच येत होता. मिटिंगला उशीर होत होता. गडबडीतच मी घराबाहेर पडलो”.
पुढे गश्मीरने लिहिलं आहे की, “त्याच संध्याकाळी ४ वाजता अचानक तळेगावातील एक्झरबिया सोसायटीमधून फोन आला. घरमालकिणीने सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत. मी म्हणालो झोप लागली असेल. त्यांची झोप खूप गाढ आहे. तरीही मी पुण्यातील माझ्या दोन मित्रांना तिथे पाठवले. तासाभरात माझ्या मित्राने फोन केला आणि म्हणाला, “गश्मीर लगेच निघ. काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येत आहे. मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्याचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्याशाप देत त्यांच्या अवतीभवती घुटमळत असेल का? बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या. अगदी आतडी पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या, वॉर्डरोब मधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास. हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या दोन व्यक्तींना, त्यांची बायको आणि मुलगा, यांना सांगत होता. माझ्या आयुष्यातला चौथा अंक समाप्त झाला आहे. आता या आणि मला घेऊन जा.
पुस्तकाचे नाव ‘चौथा अंक’ का ठेवले याबाबत सांगत गश्मीरने म्हटलं आहे की, “बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना, नाटक संपले की मग सामान बोलावले जायचे आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे. तेव्हा गमतीत म्हटले जायचे, की “चला नाटकाचे तीन अंक संपले… आता चौथा अंक सुरु”. नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. तीच प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकारदेखील त्याच्या घरी जातो, आणि मग सुरू होतो चौथा अंक – त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातील किस्से ऐकले की लोक म्हणायचे, “यावर एखादा सिनेमा बनू शकतो.” तिच्या आयुष्यातील हाच चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडला आहे”.