आज ५ जानेवारी २०२४, बॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, कलाविश्वातील कलाकार मंडळी तसेच त्याच्या असंख्य चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, अभिषेकची बहीण श्वेता बच्चन व भाची नव्या नवेली नंदा यांनीदेखील त्यांच्या भावासाठी व मामासाठी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सकाळीच लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
अभिषेकची बहीण श्वेता नंदा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्याबरोबरचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघे भाऊ-बहीण पलंगावर बसून मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे. या फोटोबरोबरच आपल्या धाकट्या भावासाठी तिने एक खास पोस्टही लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “जर तुला माहित असेल, तर तुला माहीत आहे, फक्त तुला माहीत आहे ते मलाही माहीत आहे. आज तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे आणि या दिवसांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला खूप सारे प्रेम.”
अभिषेकची भाची नव्या नवेली नंदानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्याने तिच्या मामाचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे, त्यात स्वत: अगस्त्य नंदा नव्या दिसट आहेत. हा फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “सगळ्यांच्या आवडत्या, विशेषतः माझ्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” तसेच अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – सई ताम्हणकरची संपत्ती किती?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिले खुलेपणाने उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”
दरम्यान, या सगळ्यात सोशल मीडियावर सध्या वेगळीच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे पत्नी ऐश्वर्याकडून अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त काहीच पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर अभिषेकच्या कुटुंबातील सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याची पत्नी ऐश्वर्या रायने अद्याप तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेक वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अशातच ऐश्वर्याने नवऱ्याला शुभेच्छा न दिल्यामुळे आता आणखी चर्चांना तोंड सुटले आहे.