Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’ या पर्वाची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर काल या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा दणक्यात पार पडला. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा मानकरी डोंगरीची शान मुनव्वर फारुकी ठरला. तर उपविजेतेपदावर अभिषेक कुमार होता. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे स्पर्धक यंदाच्या पर्वाचे फायनालिस्ट होते. या पाचही स्पर्धकांमध्ये अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेर मुनव्वरने विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
मुनव्वर फारुकीने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून एक स्पर्धक म्हणून मुनव्वरने उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. कठीण परिस्थितीतून आलेला मुनव्वर प्रेक्षकांचा लाडका झाला. सोशल मीडियावरुनही मुनव्वरला खूप पाठिंबा मिळाला. विजेतेपद पटकावल्यानंतर चाहते त्याचं कौतुक करत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर आजवर मुनव्वरचा वावर बऱ्यापैकी मोठा होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहिला. शिवाय स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही प्रेक्षकांनी मुनव्वरला आपलंस केलं. अशातच आता ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याने पहिली पोस्ट शेअर केली आहे. हा रिऍलिटी शो जिंकल्यानंतर मुनव्वरने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करत त्याची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
मुनव्वर फारुकीने सलमान खानबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. मुनव्वरने शेअर केलेल्या या फोटोत सलमान व मुनव्वर ट्रॉफी पकडून पोज देताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत, “खूप खूप आभार जनता. तुमचं प्रेम व पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ सलमान खान यांचे विशेष आभार”, असं म्हटलं आहे. शिवाय या पोस्टद्वारे त्याने त्याच्या फॅनपेजचेही आभार मानले आहेत. या त्याच्या पोस्टवर त्याचे चाहते लाईक्स व कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.