Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’च्या पर्वाचा महाअंतिम सोहळा दणक्यात पार पडला. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात दाखल झाले होते. या अटीतटीच्या लढाईत ‘बिग बॉस’च्या विजेतेपद डोंगरीची शान मुन्नवर फारुकीने कमावलं. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मुन्नवरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हापासून स्पर्धक म्हणून उत्तम खेळी खेळात त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाच्या ट्रॉफीवर अखेर मुन्नवरने आपलं नाव कोरलं आहे. मुन्नवरचा आजवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आजवर त्याला त्याच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. एका वादग्रस्त स्टँड-अपमुळे मुनव्वर चर्चेत आला आणि स्टँड-अप कॉमेडीयन म्हणून लोकप्रिय झाला. गुजरातमधील छोट्याश्या खेडेगावातून आलेला मुन्नवरचा कठीण प्रवास फार कठीण आहे. मुन्नवर कंगना रनौतच्या लॉकअप शोचा विजेता देखील राहिला. त्यावेळी ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुन्नवरने त्याच्या आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.
‘लॉक अप’ या शोदरम्यान मुन्नवरने आपल्या आईबद्दल एक मोठा खुलासा केला होता. याविषयी बोलताना मुन्नवर म्हणाला, “माझी आई घर चालवण्यासाठी जे जमेल ते काम करायची, परंतु आमच्या घरात तिचा मान कुणीच ठेवला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नासाठीसुद्धा माझं कुटुंब माझ्या आईलाच दोष देतं. माझ्या वडिलांवरही प्रचंड कर्ज होतं. अशी बरीच कारणं होती ज्यामुळे माझ्या आईने आत्महत्येसारखा मोठा निर्णय घेतला. माझी आई खूप खंबीर होती, तिला नेमकं काय होत आहे हे मी तिला विचारू शकलो नाही याची खंत मला आजही आहे”.
आर्थिक अडचणींमुळे मुन्नवरने लहानपणीच शिक्षणला रामराम करुन पैसे कमावायला सुरुवात केली. अगदी सामोसे विकण्यापासून त्याने काम केलं आहे. मुन्नवरची आई व आजी त्याला सामोसे बनवून द्यायची ते सामोसे एक स्टॉल लावून तो विकायचा. याशिवाय मुन्नवरने भांड्यांच्या दुकानात, तसेच गिफ्ट शॉपमध्येही काम केलं आहे.