२२ जानेवारी म्हणजेच काल अवघ्या देशभरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रामजन्मभूमी अयोध्येसह अवघा देश काल भक्तीमय वातावरणात रामलल्लाच्या प्रतिष्ठापणा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत होता. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांनी कृतकृत्य झाल्याचे म्हटले. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
प्राण प्रतिष्ठापणा सोहळा पार पडताच प्रभू रामाच्या मूर्तीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच एका व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कालच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात गोविंद देवगिरी महाराज यांनी “मला या परंपरेला बघून केवळ एका राजाची आठवण येते आहे, त्या राजामध्ये हे सर्व गुण होते, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.” असं म्हटलं. तसेच समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचेदेखील त्यांनी म्हटले.
गोविंद देवगिरी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील हा व्हायरल व्हिडीओ अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे म्हटले होते. शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमात “एक लंगोट नेसलेला आणि दाढी वाढलेला संन्याशी खडकावर राजासारखा बसला आहे. तसेच बाजूला छत्रपती उभे आहेत. ते छत्रपती आहेत. छत्रपतीपदावर बसलेले आहे. राज्याभिषेक झालेला आहे. स्वराज्याची निर्मिती झालेली आहे. राजा म्हणून राज्याभिषेक देशाने मान्य केलेला आहे. ते विनम्रपणे, शांतपणे बाजूला उभे आहे” असे म्हणाले होते आणि यावरुन मोठा वाद झाला होता. त्यांच्यावर सोशल मीडियासह अनेक स्तरातून टीका झाली होती, अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा आणखी नवीन वाद निर्माण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे