Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलीवूड परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान हिचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे . आयरा खान हिने बऱ्याच वर्षांपासून डेट करत असलेला तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नगाठ बांधली. राजस्थान येथील ‘ताज पॅलेस’ उदयपूर येथे त्यांचा शाही रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. याआधी आयरा व नुपूर यांनी मुंबईतील ‘ताज एंड’ येथे नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा उरकला होता. आयराच्या शाही रिसेप्शन सोहळ्याआधी लग्नापूर्वीच्या विधींनीही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आयरा व नूपुरच्या मेहंदी, संगीत सोहळ्याचे अनेक फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावेळी खान कुटुंबीयांच्या जवळच्या नातेवाईकांसह आयरा व नुपूरच्या जवळच्या मित्र- मंडळींनी ही हजेरी लावली. आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता व किरण राव यांची देखील लेकीच्या लग्नात प्रमुख उपस्थिती होती. दोघींनी लेकीच्या लग्नात सर्व जबाबदारी योग्यरीत्या सांभाळलेली पाहायला मिळाली. लेकीच्या लग्नात अभिनेता आमिर खान भावुक झालेला पाहायला मिळाला. लग्न मंडपात लेकीला घेऊन येत असताना आमिरला अश्रू अनावर झाले असल्याचा एक व्हिडीओसमोर आला.
आमिर खानच्या लेकीच्या लग्नानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खानने त्याच्या लाडक्या लेकीच्या लग्नाबाबत भावना व्यक्त केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी लेकीच्या लग्नाबाबत आमिरने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘स्पाइस सोशल’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा आमिरचा हा व्हिडीओ समोर आला आहे. शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आमिर खान बोलताना दिसत आहे की, “माझी भावना सनईसारखी होती. सनई हे एक असं वाद्य आहे जे लग्नांमध्ये वाजवले जाते. लग्नसराईत सनईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सनईमध्ये एक गुण आहे की, ती तुम्हाला थोडा आनंद देते आणि थोडेसे दुःखही देते. हे भावनांचे असलेलं मिश्रण हिच माझी भावना आहे” असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, आयरा-नुपूर यांचं लग्न पार पडल्यानंतर आता जियो वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचे ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी त्यांचं हे रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात आहे