‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आतापर्यंत काही प्रसिद्ध स्पर्धकांनाही ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जावं लागलं. इतकंच नव्हे तर घरातील स्पर्धकांमधील नातीही दिवसागणिक बदलताना दिसत आहेत. विकी जैन-अंकिता लोखंडे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. मुन्नवर फारुकीची लव्हलाइफ तर विशिष्ट चर्चेत आली आहे. शिवाय अंकिता घराची कॅप्टन झाल्यानंतर अनेक वाद उफाळून आले आहेत. आता अंकिताने कॅप्टन म्हणून घेतलेला एक निर्णय प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. (Ankita Lokhande Eliminated Abhishek Kumar)
गेल्या आठवड्यामध्ये ‘बिग बॉस’मधून तीन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागलं होतं. आता यामध्ये एक नवा ट्वीस्ट आला आहे. आठवड्याच्या मध्येच आणखी एक सदस्य घराबाहेर पडला असल्याचं बोललं जात आहे. घरातील कॅप्टन म्हणून अंकिताला एक विशेष अधिकार देण्यात आला होता. घरातील एका सदस्याला घराबाहेर काढण्याची संधी अंकिताला देण्यात आली. यावेळी तिने बहुचर्चित स्पर्धकाला बाहेर काढलं असल्याचं समोर आलं आहे.
अभिषेक कुमार घराबाहेर गेला असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा निर्णय केवळ अंकिताने घेतला आहे. “अभिषेकला घराबाहेर काढण्याची तुझी इच्छा आहे का?” असा प्रश्न ‘बिग बॉस’ अंकिताला विचारतात. यावर अंकिता हो असं उत्तर देत निर्णय घेते. मात्र तिचा हा निर्णय काही प्रेक्षकांना पटला नसल्याचं समोर आलं आहे. ‘द खबरी’ या एका फॅनपेजने ट्वीट करत अभिषेक घराबाहेर गेला असल्याची माहिती दिली.
शिवाय अभिषेक या आठवड्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आला होता. त्याचं समर्थबरोबर झालेलं भांडण विशेष गाजलं. भांडणामध्ये समर्थने अभिषेकवर टिश्यू फेकला. याच रागामध्ये अभिषेकने समर्थला कानाखाली मारली. ते पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. भांडणानंतर काही वेळाने अभिषेकला त्याची चूक समजली. त्याने समर्थ व ईशाची माफीही मागितली. पण या संपूर्ण प्रकारावर आता विकेण्ड का वारमध्ये सलमान खान काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.