Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी आज आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. आमिरचे घर आज पाहुण्यांनी गजबजले आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान आज बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. यावेळी नूपुरने कुर्ता, धोतर, फेटा तर आयराने लाल रंगाची साडी असा मराठमोळा लुक परिधान केला होता. (Nupur Shikhare and Ira Khan Wedding)
आज म्हणजेच ३ जानेवारी रोजी आयरा-नुपूर दुपारी कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर मुंबईतील वांद्रे भागातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये संध्याकाळी ७ वाजल्यापासून लग्नाचे रिसेप्शन सुरू होईल. खान व शिखरे कुटुंबीय रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहणार आहेत. यानंतर आमिरची मुलगी आणि जावई उदयपूरला रवाना होणार आहेत आणि तिचे शाही पद्धतीने लग्न होणार आहे. यावरुन येत्या ८ जानेवारीला त्यांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे.
या लग्नानंतर आमिर खान लेकीच्या लग्नानिमित्त बॉलिवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहे. या पार्टीत शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व मोठे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नासाठी आतुर आहेत.
दरम्यान, २०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्येच झाली होती. याचदरम्यान, दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता आणि अखेर आयरा व नूपुर हे दोघे आज एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.