लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आतापर्यंत त्याने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. या चित्रपटांतून त्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांची शौर्यगाथा प्रेक्षकांपुढे मांडली आहे. अशातच आता त्याने आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पालने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच दिग्पालने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Digpal Lanjekar On Instagram)
“वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात” असं म्हणत दिग्पालने हा पोस्टर शेअर केला आहे. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
आणखी वाचा – “तुझा पहिलाच चित्रपट अन्…” लेकासाठी प्रसाद खांडेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझं इंग्रजी ऐकताना…”
चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, प्रसन्न केतकर व मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण करणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून कलाकाराची फक्त एकांगी झलक दिसत असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेविषयी चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या नवीन पोस्टरने चाहत्यांसह शिवभक्तांची व शंभूभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना हा पोस्टर आवडल्याचे म्हटले आहे. तसेच या पोस्टरमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण असणार? याविषयीही पोस्ट केल्या आहेत.