‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. आपल्या विनोदी अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रसाद आपल्या विनोदी अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो. तो एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो उत्तम एक लेखक व दिग्दर्शकही आहे. आपल्या विनोदी लिखाण व अभिनयाने चर्चेत राहणारा प्रसाद सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. प्रसाद सोशल मीडियाद्वारे त्याच्या कामासंबंधित माहिती शेअर करत असतो. शिवाय तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. अशातच प्रसादने शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Prasad Khandekar On Instagram)
नुकताच प्रसादच्या लाडक्या लेकाचा वाढदिवस झाला आणि त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रसादने श्लोकसाठी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत असे लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्लोक. तू ७ वर्षांचा झालास आणि याच वर्षी “एकदा येऊन तर बघा” या चित्रपटातून तू छोटीशी भूमिका करुन या क्षेत्रात पदार्पण केलं आहेस. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट व अभिनेता म्हणून तुझाही हा पहिलाच चित्रपट. माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा-पुन्हा पाहायचे असतात आणि फक्त बघत नाहीस, तर आधीच्या प्रयोगात न घेतलेली एखादी एडिशन लगेच पकडतोस, आम्ही विसरलेल्या डायलॉगची पण तू आठवण करून देतोस. मी सकाळी लवकर शूटला निघतो, तेव्हासुद्धा तू झोपलेला असतोस आणि पॅकअप नंतर उशिरा घरी येतो तेव्हसुद्धा तू झोपलेला असतोस. पण त्या झोपेतसुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस तेव्हा सगळा थकवा निघून जातो. जगातील कुठली ही मसाज-मशीन जेवढं बॉडीला शांत करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होत. तुझा डान्स करताना त्या ठेक्यावर होणारं तुझं पदलालित्य. डान्स करताना एक्सप्रेशन वर भर दे म्हटलं म्हणून क्षणाक्षणाला तुझे बदलणारे हावभाव. लिपसिंक मॅच करायला तू केलेले प्रयत्न हे सगळं बघताना भारी वाटत. आपल्याला येणारा कॉम्प्लेक्स हा कधीच कोणाला आवडत नाही. पण तुझं इंग्रजी ऐकताना मला येणारा कॉम्प्लेक्स हा खूपच हवाहवासा वाटतो.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “श्लोक तू तुझ्या बालपणाचा आनंद घे. कारण तुझं लहान असण्याचा घरातील प्रत्येकजण आनंद घेत आहे. बाकी ममा, आई, ममी आई आणि आपलं सगळं कुटुंबाचा तू जीव आहेस. जेवढं ते तुझ्यावर प्रेम करतात त्यापेक्षा तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते वर्षानुवर्षे ते अजून वाढू देत. बाकी तुझा बाबा तुझ्याबरोबर आहेच श्लोक तुला खूप खूप प्रेम.”
प्रसादने शेअर केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. प्रसादच्या पोस्टखाली अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेत्री नम्रता संभेराव व संगीतकार रोहन प्रधान यांनी श्लोकला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रसादच्या अनेक चाहत्यांनीही श्लोकला कमेंट्स करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.