Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं लग्न काही दिवसांपूर्वीच अगदी थाटामाटात पार पडलं. स्वानंदी टिकेकर, मुग्धा वैशंपायनही येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता पियुष रानडेसह तिने लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सुरुचीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” म्हणत लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच तिच्या दागिन्यांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय सुरुचीने पिवळ्या रंगाच्या साडीवर परिधान केलेला डिझायनर ब्लाउजही उत्तम आहे. सुरुचीच्या लूकला साजेसा पोशाख पियुषने परिधान केला आहे.
पियुषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. या कुर्त्यावर पिवळ्या रंगाचं उपरणं त्याने घेतलं आहे. तसेच पियुष तिला मंगळसूत्र घालत असतानाचा सुंदर फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे पियुषचं हे तिसरं लग्न आहे. शाल्मली टोलेबरोबर त्याने पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनेत्री मयुरी वाघबरोबर त्याने दुसरं लग्न केलं. मयुरीसह घटस्फोट घेतल्यानंतर त्याने आता सुरुचीबरोबर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
सुरुचीने फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाकार मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर, नम्रता संभेराव आदी मंडळींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या दोघांचं लग्न नेमकं कधी झालं? याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर नाही.