मराठी तसेच मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीरने त्याच्या अभिनयाने हिंदीसह मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तो एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम डान्सरदेखील आहे. गश्मीर सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या डान्सचे रिल्स व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याचे व त्याच्या मुलांबरोबरचे हटके फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर प्रश्न-उत्तरांचं एक सत्र केलं. ज्यात त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
गश्मीरने त्याच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम स्टोरीला प्रश्न विचारण्यास सांगितले होते. यावेळी चाहत्यांनी त्याला खासगी आयुष्य, करिअर आणि त्याच्या आगामी कामादेखील काही प्रश्न विचारले. ज्याची गश्मीरने अगदी मोजक्या शब्दांत पण अचूक उत्तरे दिली. यात त्याने विचारलेल्या प्रश्नांमध्ये दोन प्रश्नांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. गश्मीरला त्याच्या एका चाहत्याने “तुझी एक दाक्षिणात्य गर्लफ्रेंड असल्याचे ऐकले आहे. तर ते खरं आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत त्याने असं म्हटले आहे की, “नाही. माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला तामिळ भाषा येत होती आणि तिनेच मला काही तामिळ भाषेतील संवाद शिकवले. सध्या ती विवाहित व आनंदी आहे आणि मी ही”.

यापुढे एका चाहत्याने त्याला “तेरे इश्क में घायल या मालिकेनंतर तुझ्याकडे कोणत्या हिंदी मालिका आल्या, ज्या तू केल्या नाहीस?” असं विचारलं. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देत “माझ्याकडे खूप मालिका आल्या. सध्याच्या टॉप मालिकादेखील मला ऑफर झाल्या होत्या.” असं उत्तर दिलं. यापुढे “पण थोडी वाट पाहूया” असंही म्हटलं. दरम्यान आगामी काळात गश्मीरचे दोन मराठी चित्रपट येणार आहेत. तसेच २०२४ या वर्षात त्याचा एक हिंदी चित्रपटदेखील येणार असल्याचे त्याने या उत्तरात म्हटले आहे.

आणखी वाचा – भावाच्या हळदीसाठी नटली नम्रता संभेराव, लेक-पतीसह फोटो शेअर करत म्हणाली, “मामाची हळद…”
काही दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे गश्मीरवर आरोपांची राळ उठली होती. मात्र काही काळानंतर त्याने या सगळ्यावर स्पष्ट मत मांडत स्वत:ची बाजू सिद्ध केली. दरम्यान आपल्या नृत्य व अभिनयाने चर्चेत असणारा गश्मीर चाहत्यांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.