नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्याच्या यादीत वैभव मांगले हे नाव आवर्जून घेतलं जात. अभिनय क्षेत्रात कुणीही वारसा नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वैभव मांगले छोट्याश्या गावातून मुंबईत आशेचा किरण घेऊन आले. यशस्वी अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. अभिनयाबरोबरचं गायन व सूत्रसंचालन यांसारख्या मनोरंजनाच्या क्षेत्रातही वैभव मांगले यांनी चांगलंच नाव कमावलं. वैभव मांगले यांचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नेहमीच ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर सोशल मीडियावरून भाष्य करताना दिसतात. (Vaibhav Mangale On Navratrotsav)
अनेकदा वैभव मांगले यांनी भाष्य केलेले हे मुद्दे काहींच्या अंगवळणी पडतात तर काहींना खटकतात. बरेचदा मांगले ही नेटकऱ्यांच्या तावडीत सापडलेले पाहायला मिळाले आहेत. मात्र आता वैभव मांगले यांनी केलेली एक पोस्ट प्रेक्षकांना ही पटली आहे. वैभव मांगले यांनी नवरात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या गरबा या कार्यक्रमावर भाष्य केलं आहे. “आता दुर्गेच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर वाजत गाजत विसर्जनाची प्रथा कुठून सुरु झाली?” असा प्रश्न करत त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

वैभव मांगले यांनी नवरात्रोत्सवाबाबत केलेल्या प्रश्नावर साऱ्या नेटकऱ्यानी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. वैभव मांगले यांनी केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देत एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “सध्या मिरवणूक नसून ती धिंड असं वाटतं. सण उत्सव सण याचा मूळ उद्देश आपण हरवला किंवा हरवत आहोत. झोपलेल्यांना उठवता येत पण झोपेच सोंग घेतलेल्यांना उठवणं अशक्य. समाजात योग्य व्यक्ती कडून धार्मिक शिक्षण होत नाही..!!!!आपण हिंदू फक्त शिक्षणावर भर देतो पण धार्मिक संस्कार आणि त्याचा आदर देण्यात आपण कमी पडतोय हे नाकरता येत नाही. माझं बोलणं तीव्र असेल किंवा पटणार नाही काही लोकांना.” नेटकऱ्याच्या या कमेंटवर वैभव मांगले यांनी कमेंट करत “बरोबर” असं म्हटलं आहे.

तर आणखी एका नेटकऱ्याने राग व्यक्त करत, “यांना देवाच्या नावाने इव्हेन्ट साजरे करायचे आहेत, बाकी मुहूर्त, देव, भक्ती सब झूट” असं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने मांगलेच्या प्रश्नावर गमतीशीर उत्तर देत म्हटलं आहे की, “यावर्षी तयार झालेल्या नवीन प्रथांपैकी एक प्रथा.” दरम्यान नवरात्रोत्सव व विसर्जनादिवशी रात्री उशिरापर्यंत चालणारा गरबा ही आपली संस्कृती नसल्याचं ही अनेकांनी म्हटलं आहे.