Baba Maharaj Satarkar Passed Away : प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर हे जग सोडून गेल्याचं दुःख कलाकार मंडळींमध्येही पाहायला मिळालं. मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने आपल्या भावना व्यक्त करत बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
संकर्षणने भावुक होत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “बाबा महाराज सातारकर, फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन, प्रत्यक्ष तुम्हाला पाहत, तुमचे अभंग, किर्तन, प्रवचन ऐकावं. आता ती संधी नाही गळा भरून आला आहे. माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता, त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. पहिल्यांदा मला तुकोबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली.”
यापुढे संकर्षणने लिहिलंय, “आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे. आल्यावर आजी म्हणायची, “काय सांगू तुम्हाला पोरांनो. बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत” हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू? प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय?” किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं, ठेवत राहील !!”
पुढे तो असंही म्हणाला आहे की, “मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण, बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी, स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय. आज ते आपल्यातून गेले पण मी तरी या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन ! आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल, ‘धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शीण गेला’.”