मराठी कलाविश्वातील क्युट जोडी म्हणजे उमेश कामत व प्रिया बापट. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेली ही जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांची जोडी ऑनस्क्रीन जितकी चांगली दिसते, तितकीच त्यांची ऑफस्क्रीन बाँडिंगही सुंदर आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ते दोघे अनेकदा विविध ठिकाणी फिरताना दिसतात. त्याचबरोबर ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर अनेक रिल्स व फोटो शेअर करतात. (Umesh Kamat Skydiving in Australia)
उमेश व प्रिया सध्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला गेली असून नाटकाच्या प्रयोगानंतर ते सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते दोघं स्काय डाईव्हिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत उमेशने एक पोस्टदेखील लिहिली आहे. ज्यात त्याने आपला स्काय डाईव्हिंगचा अनुभव शेअर केला आहे. उमेश या पोस्टमध्ये म्हणाला की, “मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की, मी कधी स्कायडाईव्ह करण्याचा विचार सुद्धा करू शकेन. मला उंचीची भयंकर भीती वाटते, हाईट फोबिया म्हणतात तसं काय ते. साध्या इमारतीच्या गच्चीवरून खाली बघितलं, तरी माझे हातपाय गळून जातात. म्हणूनच आयुष्यात मी एक काय तो ट्रेक केला आणि शपथ घेतली परत कधीही ट्रेकिंग वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही.”
पुढे म्हणाला, “आमच्या नाटकाचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरला, तेव्हा आम्ही ही ट्रिप ४ दिवस वाढवायचं ठरवलं. पण प्लॅनिंग करायला फारसा वेळ नाही मिळाला. तरी स्कायडाईव्ह हा विचार दूर पर्यंत नव्हता. खरंतर मला पाण्याची भिती नसल्याने मी आणि प्रियाने स्कुबा डाईव्ह करायचं ठरवलं, पण वेळेअभावी क्विन्सलँडला जाऊन स्कुबा डाईव्ह करणं अवघड दिसायला लागलं. तेव्हा मला एक दिवस अचानक कळलं की, आशुतोषने स्काय डाईव्हिंगचं बुकिंग केलं. प्रिया इतकी उत्सुक झाली की, तिने हे करायचं ठरवलं आणि मला विचारलं तू पण कर ना. तेव्हा बुकिंगसाठी सगळे पैसे भरायचे नव्हते आणि मी त्या मोहाला बळी पडलो. म्हटलं आता हो म्हणू नंतर माघार घेऊ. पण तो दिवस आणि स्कायडाईव्ह झाल्यावरचा आजचा दिवस, मी माझी भीती घालवण्यासाठी केलेला प्रयत्न हा अविस्मरणीय अनुभव होता.”
हे देखील वाचा – घोडबंदर रोडवरील सततच्या ट्रॅफिकमुळे वैतागली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, म्हणाली, “अर्ध्या तासाच्या रस्त्याला…”
“मला स्काय डाईव्हिंग करण्यासाठी आत्मविश्वास देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर मी प्रिया आणि आशुतोषचे विशेष आभार मानतो. कारण त्यांना माझी भीती माहीत असूनसुद्धा मी हा अनुभव घ्यावा, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी माझ्या मनातील भीती काढून आत्मविश्वास वाढवला”, असं म्हणत त्याने त्याच्या सहकाऱ्यांचे व चाहत्यांचे आभार मानले आहे. त्याचबरोबर प्रियानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्काय डाईव्हिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हे देखील वाचा – “हॉटेल सुरु करायचं तुझं स्वप्न होतं पण…” अभिनेत्री माधुरी पवारच्या भावाचं निधन, म्हणाली, “नियतीच्या मनात…”

दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्याचबरोबर कलाकार मंडळीही त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट केली की, “आईशप्पथ सॉलिड यार, मलाही कधीतरी जुलियाबरोबर स्काय डाईव्हिंग करायचं आहे.” त्यावर उमेशने “नक्की कर”, असा रिप्लाय दिला आहे.