मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या हे नेहमीचं झालं. मुंबई व त्या आसपासच्या परिसरात सध्या रस्त्यांच्या व मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे नेहमीच ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे. त्यातही जर एखादे अवजड वाहन आले, तर ते अधिकच कठीण बनते. याच ट्रॅफिकचा त्रास सर्वसामान्यांसह कलाकार मंडळीना सहन करावा लागत असून असाच अनुभव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हिला आला आहे. (Namrata Sambherao on Traffic Issues)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून नम्रता घराघरात पोहोचली. तिच्या विनोदी अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग आहे. लोकांना मनमुराद हसवणारी अभिनेत्री मात्र एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नम्रता तिच्या कामानिमित्त अनेकदा मुंबई-ठाणे असा प्रवास करते. मात्र, घोडबंदर रोडवर सुरु असलेल्या विविध कामामुळे तिला अनेकदा तिथल्या ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर तिने याबद्दल नुकतीच एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – “हॉटेल सुरु करायचं तुझं स्वप्न होतं पण…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाचं निधन, म्हणाली, “नियतीच्या मनात…”
नम्रताने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती घोडबंदर रोडवर होत असलेल्या ट्रॅफिकबद्दल बोलली आहे. तसेच तिने स्थानिक प्रशासनाने यावर उपाययोजना राबवण्याची विनंती केली आहे.
हे देखील वाचा – “म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा”, म्हणणाऱ्यावर भडकल्या ऐश्वर्या नारकर, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या, “म्हातारचाळ लागायचा रोग…”
नम्रता या पोस्टमध्ये म्हणाली, “काय करायचं या घोडबंदर रोडचं, लोडेड ट्रक-टेम्पो पलटी होतात. साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते किमान ९५% प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडला, त्याचा ही थांगपत्ता लागत नाही. कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं, त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय. सुखसोयी असलेले मोठमोठे टॉवर झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल, ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे, पण तीसुद्धा गायमुखपर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला २ ते ३ तास लागतात. काय होऊ शकतं ह्यावर?”, असा प्रश्न तिने केला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहे.