महाराष्ट्राचा हास्यविर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता भूषण कडू. त्याचे बालपण गिरगाव येथील चाळीत गेले. बाबा मिल कामगार असल्यामुळे घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. त्याला अभिनयाचे धडे देणार असं घरात कुणीही नव्हतं. पण एखाद्या कलाकाराला त्याच्या अंगातील कला स्वस्त बसून देत नाही. त्याचा अभिनयाचा हा प्रवास इयत्ता सातवीपासून सुरु झाला. बालनाट्यात काम करत करत तो अभिनयाचे धडे गिरवू लागला. त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेत भाग घेण्यास सुरवात केली.
एकांकिका स्पर्धेत भाग घेत असताना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक भूषणलाच मिळायचं. अनेक एकांकिका केल्यामुळे कोणत्याही स्पर्धेवरून घरी येताना त्याच्या हातात ट्रॉफीज असायच्या. घरी आल्यावर त्याचे बाबा म्हणायचे जेवणाच्या ताटात ट्राफिजच वाढ तसंही त्याचं पोट या बक्षिसांनीच भरलं असेल. कुटूंबात भूषण एकुलता एक होता. त्यामुळे त्याच्या वडिलांना त्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटत होतं.
भूषणचे बाबा उत्तम चित्रकार होते. एकदा त्यांनी भूषणला एक अट घातली ती अट म्हणजे ”आयुष्यात तुला जे करायचं आहे ते कर पण माझी एक अट आहे. तू सिविल इंजिनियर बनून दाखव”. बाबांची ही इच्छा भूषणने पूर्ण केली. सिविल इंजिनिअरिंग करता करता तो कार्यक्रमांमध्ये डान्सही करायला जात असे. दरम्यान त्याने त्याच्या आवडी निवडी जोपासत शिक्षण पूर्ण केलं. एकदा दिग्दर्शक भारत तांडेल यांनी भूषणचा अभिनय पहिला आणि त्याला बोलावून घेतलं. तेव्हा त्याने त्यांच्यासह ‘वाडा चिरेबंदी’, ‘चारचौघी’ या मालिकेचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक बनायला आलेला भूषण कलाकार झाला.
त्याचं पाहिलं व्यावसायिक नाटक ‘जाणून बुजून’ हे होतं. या नाटकाचे जवळपास २५० ते ३०० प्रयोग पार पडले. त्यानंतर व्यावसायिक नाटकांचा त्याचा प्रवास सुरु झाला. त्याने २२ पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकं केली आहेत. चित्रपटसृष्टीत ‘कॉमेडी एक्प्रेस’ या शोमुळे त्याला खरी ओळख मिळाली. ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या कार्यक्रमाने तब्ब्ल ७ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भुताची शाळा, बत्ती गुल, नवरा माझा भवरा, मस्त चालाय आमचं यांसारखे अनेक चित्रपटात त्याने काम केलं आहे.
भूषण मराठी ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीजनमध्ये झळकला होता. भूषणची हळवी बाजू ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळाली होती. स्पर्धक म्हणूनही भूषण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. भुषणचा मुलगा आणि पत्नी जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात आले होते, तेव्हा भूषण खूप जास्त भावुक झाला होता. जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती हळवा होतोच. करोना काळ आपल्या सगळ्यांसाठीच कठीण काळ होता. करोनाचा भूषणला मोठा फटका बसला. याकाळात त्याने त्याच्या पत्नीला गमावलं. त्याला एक मुलगा आहे. सध्या तो एकटाच त्याचा सांभाळ करत आहे. पत्नीच्या निधनानंतर खचलेला भूषण सध्या कोणत्या ही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. तसेच तो सोशल मीडियापासूनही दूर आहे. २०२२मध्ये स्मिता गोंदकरने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये तो शेवटचा दिसला होता. भूषणने पुन्हा एकदा कलाविश्वात परतावं हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.