मराठी चित्रपटसृष्टीमधील रिअल लाइफ कपलपैकी सतत चर्चेत असणारं एक जोडपं म्हणजे श्वेता मेहेंदळे व राहुल मेहेंदळे. श्वेता व राहुल सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत एकत्र काम करत आहेत. दोघंही मालिकेत साकारत असलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. श्वेता मालिकेत साकारत असलेलं इंद्रायणी हे नकारात्मक पात्र सध्या प्रचंड गाजत आहे. प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करणाऱ्या या जोडप्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी राहुलला एका आजाराचा सामना करावा लागला होता. तो संपूर्ण काळ श्वेता व राहुलसाठी अगदी कठीण होता.
श्वेता व राहुल यांच्या संसाराला आता २० वर्ष झाली आहेत. या २० वर्षांच्या काळामध्ये दोघांनीही एकमेकाला उत्तम सांभाळून घेतलं. तसेच प्रत्येक प्रसंगामध्ये एकमेकाला साथ दिली. सगळं सुरळीत सुरु असताना एका आजाराने राहुलला घेरलं. याचबाबत काही दिवसांपूर्वी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात राहुल व श्वेताने भाष्य केलं होतं. राहुल रुग्णालयामध्ये असताना श्वेता तिच्या कामामध्ये व्यग्र होती. पण तिच्यासाठीही हा संपूर्ण काळ कठीण होता.
राहुलला अचानक ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागला. दरम्यान त्याचं बोलणंही कठीण झालं होतं. चार ते पाच दिवस राहुलला रुग्णालयामध्ये भरती करण्यामध्ये आलं. याचबाबत श्वेताने सांगितलं होतं की, “’माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचं माझं चित्रीकरण सुरु होतं. तसेच माझ्या नाटकाचं तालीम सुरु होतं. त्याचवेळी माझे पुण्यामध्ये दोन कार्यक्रमही होतं. या सगळ्यामध्ये कोणत्याच गोष्टीला मी नाही म्हणू शकत नव्हते. पुण्याला पोहोचल्यानंतर दुपारी मला माझ्या बाबांचा फोन आला की, राहुलला रुग्णालयामध्ये भरती केलं आहे. संध्याकाळी माझा पुण्यामध्ये कार्यक्रम होता. कार्यक्रमाला जाईपर्यंत मी रडत होते. त्या कार्यक्रमातल्या लोकांशीही मी बोलले नाही. तिथे मी कसं सगळं केलं हेच मला कळत नव्हतं”.
“मला वेळ नव्हता. पण त्याकाळात राहुलचे बाबा, भाऊ आणि एकूणच संपूर्ण कुटुंब आमच्या दोघांच्या पाठिशी उभं राहिलं. रुग्णालयामध्ये थांबून मला राहुलला तेवढा वेळ देता आला नाही. अभिनेता म्हणून या आजारानंतर राहुल पुन्हा उभा राहिल का? असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. पण त्या आजारामधून राहुल बाहेर आला”. आता राहुल अगदी पहिल्यासारखं उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.