Sai Tamhankar New Home : मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये मानाचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठीमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. तिने अधिकाधिक मेहनत करत यशाचं शिखर गाठलं. ती इथवरच थांबली नाही. सईने बॉलिवूडकडे तिचा मोर्चा वळवला. बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत तिने पुरस्कारही पटकावला. आता सई स्वतःसाठी एक सुंदर आयुष्य जगत आहे. तिने स्वतःच्या हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे. (Sai Tamhankar New Home video)
सईने स्वतःचं युट्युब चॅनल सुरु केलं आहे. याद्वारे तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जुन्या घरामधून बाहेर पडताना सई रडताना दिसली होती. जुन्या घरामध्ये तिच्या बऱ्याच आठवणी होत्या. ते घर छोटं असलं तरी तिच्यासाठी खास होतं. शिवाय सईचं तिच्या घराशी एक वगेळंच नातं होतं. जुन्या घरामधून खूप आठवणी घेऊन सई तिच्या नव्या जागी राहण्यासाठी गेली आहे.
आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने स्वयंपाक घरात बसून बनवले उकडीचे मोदक, सुकन्या मोने म्हणाल्या, “तुझ्यासारखा…”
सईने तिच्या नव्या घराचा व्हिडीओ आता युट्युब चॅनलवर प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमध्ये सईचं घर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गगन चुंबी इमारतीमध्ये तिने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचं इंटेरियर अगदी लक्ष वेधून घेणारं आहे. तसेच लिव्हींग रुममध्ये सईने झाडं ठेवली आहेत. ती म्हणाली, “जुन्या घरामध्ये मी झाडं लावू शकली नाही. कारण मी ज्या इमारतीमध्ये होते तिथे घरामध्ये झाडं लावण्यावर बंदी होती. म्हणून नव्या घरामध्ये मी लिव्हींग रुममध्येच झाडं ठेवली आहेत”.
डायनिंग टेबलवर बसून कधीच जेवली नसल्याचं सईचं म्हणणं आहे. म्हणून तिने तिच्या घरामध्ये डायनिंग टेबल तयार करुन घेतला. शिवाय तिचं वॉर्डरॉबही अगदी मोठं आहे. मेकअपसाठी विशेष जागा तिने तयार केली आहे. तिच्या घरामधून सुंदर हिरवागार निसर्गही दिसतो. शिवाय संपूर्ण शहराची एक झलक पाहायला मिळते. ती म्हणाली, “१५ वर्ष सतत काम केल्यानंतर निवांत श्वास मी घेतला आहे”. कष्टाने उभारलेल्या घराचा सईला अभिमान आहे.