‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एकामागोमाग एक रंजक मालिका येतंच असतात, अशातच एका नव्या मालिकेने एन्ट्री केली असून या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव ‘प्रेमाची गोष्ट’ असं आहे. सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आलेल्या या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेतून समोर येणाऱ्या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरणार आहे. या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे व अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून आणखी एक गाजलेला चेहरा समोर येणार आहे. (Apurva Nemlekar New Serial)
हा गाजलेला चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. शेवंता या पत्रामुळे अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमध्ये अपूर्वाने केलेला दंगा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
आता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस अंदाजात अपूर्वा छोटा पडदा गाजवायला सज्ज होतं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या ४ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी ८ वाजता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून अपूर्वा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
सावनी या पात्राविषयी बोलतानाअपूर्वा नेमळेकर म्हणाली, “‘स्टार प्रवाह’सोबत जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. या मालिकेत मी खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मी खलनायिका जरी साकारत असले तरी या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. सावनी हे पात्र उभं करताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. या भूमिकेसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करतेय. माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली जातेय. मी या भूमिकेसाठी बरचसं वजनही कमी केलंय”.

“सावनी अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे साड्यांपासून ते अगदी तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खुपचं खास असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे. प्रेक्षकांनी मला माझ्या प्रत्येक कामात मोलाची साथ दिली आहे. हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे”.