Pankaj Tripathi Father Passed Away : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या बेलसंड या गावी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. दोघांमध्ये जीवापाड प्रेम होतं. वडिलांच्या निधनानंतर पंकज व त्रिपाठी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वृद्धपकाळाने वा कोणत्या आजाराने पंडित बनारस तिवारी यांचं निधन झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच पंकज त्यांच्या गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. पंकज यांच्या कुटुंबियांना पंडित बनारस तिवारी यांच्या निधनाबाबत माहिती सांगितली आहे.
आणखी वाचा – “मराठी कलाकारांबरोबर काम करणं कठीण कारण…”, ‘ताली’वरुन सुष्मिता सेनचं भाष्य, म्हणाली, “ते सगळे कलाकार…”
पंडित बनारस तिवारी यांच्या राहत्या घरीच त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. आज त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. बिहार येथील गोपालगंज या भागामध्ये पंकज यांचं गाव आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब गावीच स्थायिक आहे. पंकज कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. पण कामामधून मिळालेल्या वेळेमध्ये ते गावी जात होते.
पंकज यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “मी कलाक्षेत्रामध्ये आतापर्यंत जे काही मिळवलं आहे त्यामध्ये माझ्या वडिलांना अजिबात रस नाही. कलाक्षेत्रामध्ये आपला मुलगा काय करतो? हेही त्यांना माहित नाही”. शिवाय वडील फक्त एकदाच मुंबईला आले आणि त्यांना मोठ्या इमारती, घरं आवडत नसल्याचं पंकज यांनी सांगितलं होतं. पंकज यांच्या वडिलांचं राहणीमान अगदी साधं होतं हे यावरुन लक्षात येतं.