सुष्मिता सेनच्या ‘ताली’ वेबसीरिजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ‘ताली’चं पोस्टर, टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या ‘ताली’चीच सगळीकडे हवा आहे. सुष्मिताच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबसीरिज आहे. तृतीयपंथीयांचं आयुष्य नेमकं कसं असतं? ते विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? याबाबत एका मुलाखतीत गौरी सावंत यांनी भाष्य केलं होतं.
रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. गौरी या स्वतः सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तसेच तृतीयपंथीयांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. आज समाजामध्ये गौरी सावंत हे नाव आदराने घेतलं जातं. पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. तसेच समाजामधून मिळणाऱ्या वागणुकीमुळेही मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं.
आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात भरती होती गश्मीरची आई, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आई आता…”
खासगी वाहनाने किंवा ट्रेनमधून प्रवास करत असताना तृतीयपंथी आपल्याजवळ येतात. टाळी वाजवतात आणि आपण पैसे न देऊनही आपल्याला आशिर्वाद देऊन जातात. पण तृतीयपंथी एक विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? याबाबत गौरी यांनी सांगितलं होतं. झी मराठीच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात गौरी यांनी हजेरी लावली होती. त्यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
दरम्यान तृतीयपंथी यांच्या टाळी वाजवण्याची पद्धत याविषयी त्यांनी भाष्य केलं होतं. गौरी यांनी म्हटलं होतं की, “सिग्लनवर किंवा ट्रेनमध्ये तृतीयपंथी टाळी वाजवतात ती सर्वसामान्यांसारखी नसते. सुखकर्ता दुःखहर्ता आरतीसाठी जशी टाळी वाजवतात तशी ही टाळी नसते. मी काय आहे हे सिद्ध करण्यासाठी तृतीयपंथी वेगळ्या प्रकारची टाळी वाजवतात. त्यांच्या टाळीमागचा आक्रोश तुम्हाला कळायला हवा”. त्याचबरोबरीने या कार्यक्रमात गौरी सावंत यांनी अजून किती वर्ष तृतीयपंथी टाळ्या वाजवणार? असा प्रश्नही केला होता.