कलाक्षेत्रात काम करायला येणाऱ्या मंडळींच्या नशीबी स्ट्रगल काही चुकलेला नाही. बरीच मंडळी या चंदेरी दुनियेत स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र हाती निराशा आली की टोकाचं पाऊल उचलतात. काही कलाकारांनीही निराशेपोटी आपला जीव गमावला असल्याची घटना घडल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अभिनेता ललित मनचंदाने आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या ३६व्या वर्षी ललितने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पण ललितने हा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा होताना दिसत आहेत. (actor lalit manchanda suicide)
पोलिसांच्या माहितीनुसार, राहत्या घरी ललितने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र ललितने असं का केलं? याबाबत कोणतेच पुरावे पोलिसांच्या हाती अद्यापही मिळाले नाहीत. ललितने आजवर बॉलिवूड चित्रपट व मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या.
आणखी वाचा – चुलत भावाबरोबर शारीरिक संबंध, घाणेरडं मासिक पाहून जे केलं…; सुप्रसिद्ध गायकाचे धक्कादायक खुलासे
ललित अलिकडच्याच एका वेबसीरिजमध्ये कामही करणार होता. त्याबाबत तो उत्साही होता. ललितच्या जवळच्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, काही काळ तो मानसिक तणावामध्ये होता. तसेच खासगी समस्यांमुळे तो त्रस्त होता. ललितच्या अचानक जाण्याने कुटुंबिय, मित्र-मंडळींना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबरीने ललितचे कुटुंबिय व मित्र-मंडळींची पोलिस चौकशी करत आहेत.
तपासामध्ये पोलिसांनाही काहीच हाती मिळालं नाही. शिवाय आत्महत्येपूर्वी ललितने कोणतीच चिट्ठीही लिहून ठेवलेली नाही. ललित जिथे राहत होता तेथील मंडळीही या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. मानसिक आरोग्य व नैराश्य यास कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचंही म्हणणं आहे. मानसिक आरोग्याशी दोन हात करणाऱ्यांना मदतीची गरज असते. तरच आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यास बहुदा मदत होईल.