प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत असताना कलाकार मंडळी स्वतःला कलेमध्ये वाहून घेतात. सुख, दुःख विसरुन कामात मग्न होतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र काही कलाकारांचा वेगळाच स्ट्रगल असतो. असाच स्ट्रगल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरलाही सहन करावा लागला. मराठी मालिकांसह ‘बिग बॉस मराठी’मुळे जान्हली घराघरांत पोहोचली. तिचा इथवरचा प्रवास प्रेरणादायी आहे. लग्नानंतर तिने तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मात्र काही वर्ष ती एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. जान्हवीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यादरम्यान नक्की काय घडलं?, तिने या परिस्थितीशी दोन हात कसे केले याबाबत जान्हवीने उघडपणे भाष्य केलं आहे. (Marathi Actress Jahnavi Killekar)
सहा दिवसांनी शुद्धीवर आली तेव्हा…
‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये जान्हवीने तिच्या आजाराबाबत भाष्य केलं. तिला याबाबत प्रश्न विचारता म्हणाली, “जेव्हा ईशांत (मुलगा) दिड महिन्यांचा झाला तेव्हा हे घडलं. मी स्वयंपाकघरात काम करत होते. माझं अर्ध शरीर अचानक उडायला लागलं. शरीराच्या उजव्या बाजूला त्रास व्हायला लागला. मी पाय पकडून बसले. सगळ्यांना मी हाक मारत होते की, बघा मला काहीतरी होत आहे. मला काही कळेचना. डोक्यात खूप मुंग्या यायला लागल्या आणि मी बेशुद्ध झाले”.
वेड्यांचे झटके, लेक दिड महिन्यांचा आणि…
पुढे ती म्हणाली, “मला बेडवर उचलून ठेवलं. त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी मला जाग आली. पण डोक्यातील मुंग्या काही कमी होत नव्हत्या. सासू-सासरे, जाऊबाई, नवरा सगळेच माझ्या जवळ बसलेले. कृपया मला वाचवा वाचवा असं मी सतत ओरडत होते. त्याक्षणी मला असं वाटलं की, मी मरणारच. त्या त्रासामध्ये पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर सहा दिवसांनी मला शुद्ध आली. मी आयसीयुमध्ये होते. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा खूप रडले. ईशांत दिड महिन्यांचा होता. त्याक्षणी मला असं झालं की, माझं बाळ कोणाबरोबर आहे?, ते काय करत असेल? असे अनेक प्रश्न मनात आले”.
“त्याचदरम्यान आम्हाला कळालं की, माझ्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी आहेत. त्यानंतर ट्रिटमेंट सुरु झाली”. यादरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा माझ्या मेंदूवरही परिणाम होत होता. याचाच परिणाम म्हणून मला वेड्याचे झटकेही यायचे. मध्येच हसायचे, रडत बसायचे. साधारण नऊ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हापासून माझा नवराच माझ्या मुलाला सांभाळत आहे. कारण तेव्हा मला शुद्ध नसायची. औषध घेतली की, मी एकतर झोपूनच राहायचे किंवा हसत, रडत बसायचे. घराच्या बाहेरही जात नव्हते. माझं तेव्हा वजनही ९० ते ९५च्या घरात झालं होतं”.
अजूनही होतो त्रास, संवाद विसरते तेव्हा…
“अजूनही माझ्याकडे जेव्हा एक पान किंवा दोन पानभर संवाद आले की, मला लक्षात ठेवणं कठीण जातं. याचाच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मला ईशांतचं बालपणच आठवत नाही. मी माझ्या बाबतीतल्याही बऱ्याच गोष्टी विसरुन गेले आहे. त्या गोष्टीचं मला अजूनही खूप वाईट वाटतं. तीन ते चार वर्ष या सगळ्या आजारात मी होते”. जान्हवीचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.