Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक नेहमीच चर्चेत राहील आहे. काही दिवसांपासून मालिकेत सायली व अर्जुन यांच्यात दुरावा आला असल्याचं दिसतंय. मालिकेत सायली व अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य समोर आल्याने सुभेदार कुटुंबीयांनी सायलीला घराबाहेर काढलं आहे. तेव्हापासून सायली मधुभाऊंच्या घरी राहत आहे. तर मधुभाऊंच्या नजरेतूनही सायली व अर्जुन उतरले आहेत. सायलीला तर त्यांनी अर्जुनला भेटायचं नाही अशी अट घातली आहे. तरीसुद्धा अर्जुन मधुभाऊंच्या मनात जागा निर्माण करण्याचं ठरवतो. सायलीला भेटायला गेला असताना अर्जुनवर चाळीत हल्ला केला जातो. आपल्या नवऱ्याला मारहाण होतेय हे पाहताच सायलीचा जीव कासावीस होतो.
भर चाळीत सायली “अहो…” असं ओरडते. एवढ्यात अर्जुनवर पाठीमागून वार केला जातो आणि तो जमिनीवर पडतो. हे सगळं पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते. मधुभाऊंचा हात झटकून ती अर्जुनकडे जाते. आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. शेवटी सायली आपल्या प्रेमाची कबुली देत, “माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर” असं म्हणते. सायलीचे हे शब्द ऐकताच अर्जुन शुद्धीवर येतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.
त्यानंतर समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सायली अर्जुनला मलमपट्टी करत असते. यावेळी अर्जुन प्रेमाने आपल्या बायकोला धीर देत असं म्हणताना दिसतोय की, “एक दिवस घरचे सगळे तुम्हाला परत घरी बोलावतील. सर्वांचं मन जिंकून तुम्ही पुन्हा घरी याल”. हे सगळं झाल्यावर अर्जुन घरी जातो. त्यानंतर अर्जुनचे वडील प्रताप अर्जुनला त्याच्याशी काही बोलायचं आहे असं सांगतात. यावर अर्जुन ‘काय बोलायचं आहे’, असं त्यांना विचारतो.
त्यानंतर पूर्णा आजी पुढाकार घेत अर्जुनसमोर असं काही बोलतात ज्याने अर्जुनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. पूर्णा आजी अर्जुनला त्याच्या आणि तन्वीच्या लग्नाचा विचार केला असल्याचं सांगतात, हे ऐकून अर्जुन पूर्णपणे शांतच होतो. आता पूर्णा आजीने आणि घरच्यांनी घेतलेला हा निर्णय अर्जुनला पटेल का?, अर्जुन या निर्णयावर काय प्रतिक्रिया देईल हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.