Mahima Mhatre Accident : मालिकेतील कलाकार नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. दिवस-रात्र, ऊन-वारा, पाऊस कसलाही विचार न करता हे कलाकार प्रेक्षकांसाठी नेहमीच तत्पर असतात. बरेचदा आजारपणातही आपल्यामुळे टीमचा खोळंबा होऊ नये म्हणून ते शूटिंगला पोहोचतात. दरम्यान, बरेचदा सेटवर कलाकारांचाही अपघात झालेला ऐकायला मिळाला आहे. अशातच आता ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील महिमा म्हात्रेने अपघाताविषयी सांगितले. मीरा गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब होती. अभिनेत्री महिमा म्हात्रे हे पात्र ती या मालिकेत साकारत आहे. अलिकडेच तिचे दमदार पुनरागमन झाले असून, कमबॅक एपिसोडमध्ये जीवाची बाजी लावून तिने अथर्वचा जीव वाचवला.
कमबॅकनंतर मीराच्या नाकावर झालेली जखम आणि तिच्या डोळ्यांचा बदललेला रंग या गोष्टींकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलं आणि सोशल मीडियावर तिला याविषयी असंख्य प्रश्न विचारले गेले. अलिकडेच मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रेने याविषयी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या शंकेचे निरसन केले. महिमा म्हणाली, “तुमच्यापैकी अनेकजण मॅसेज, डीएम किंवा कमेंट करुन विचारतायंत की, मीरा तुझ्या नाकावर काय झालंय? तर मला त्यांना सांगायचंय की, मालिकेमध्ये अॅक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडसं लागलं आहे. डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करु नये, असा सल्ला दिला. त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय”.
महिमा पुढे म्हणाली, “ही दुखापत डोळ्याच्या अगदी जवळ असल्याने, मला लेन्स लावता येत नाही आहेत. म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला मालिकेमध्ये हा नवीन लूक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. मध्यंतरी मी एपिसोडमध्ये नव्हते, तेव्हासुद्धा तुम्ही खूप मॅसेज केले, कमेंट केल्या. या सगळ्यातून मला तुमचं प्रेम कळत होतं आणि मला ते मॅसेज वाचून छान वाटत होतं”.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध गायक, आनंद साजरा करत शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्यात पुन्हा…”
शेवटी महिमा म्हणाली, “मला माहित आहे यापूर्वी तुम्ही मीरावर खूप प्रेम केलं आहे, आता मीरामध्ये जो छोटासा बदल पाहायला मिळत आहे, तो तुम्ही स्वीकारुन तिच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम कराल”, असं म्हणत तिने हात जोडून प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आभार मानले.





