‘झी मराठी’ वाहिनीने आजवर प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. या वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेच्या ऑफिशिल पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघांचं अपहरण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र हे अपहरण कोणी केलं आणि का केलं याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. ही ब्रेकिंग न्यूज चर्चेत असतानाच आता या कार्यक्रमाच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Drama Juniors New show)
या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ नावाचा नवा कार्यक्रम सुरु होत आहे आणि या कार्यक्रमादरम्यानचाच हा एक खास प्रोमो शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये कार्यक्रमातील बच्चे कंपनी संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं अपहरण करताना दिसत आहेत. हे मालिकेच्या प्रोमोमधून समोर आलं आहे.
तर प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, संकर्षण व अमृता परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत. सर्व ड्रामेबाज मुलं दोघांना परीक्षण करण्यासाठी सांगत आहेत. तर संकर्षण व अमृता दोघांनीही परीक्षणासाठी होकारही दिलेला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान ‘ड्रामा जूनियर्स’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी झी मराठी वाहिनीचा अनेक वर्षांपासूनचा लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. हा लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री श्रेया बुगडे.
श्रेया बुगडे ‘ड्रामा जूनियर्स’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. आता ‘झी मराठी’चा हा नवा कार्यक्रम कधीपासून सुरु होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन घेऊन आता या बहुरंगी मुलांच्या अभिनयाची झलक ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे.