‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळालं. चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं. त्यामुळे अक्षरा चारुहास व चारुलता (भुवणेश्वरी) यांचा लग्न थांबवण्याचा निर्णय घेते आणि यासाठी ती हॉस्पिटलमधून पळ काढते. हॉस्पिटलमधून बाहेर पडणे शक्य नसल्याने अक्षरा नर्सच्या वेषात बाहेर पडते. त्यानंतर अक्षरा थेट घरी येते आणि चारुहास व चारुलता यांचे लग्न मोडते. अशातच आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
अक्षरामुळे भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते. “माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले,” असं ती चारुहासला म्हणते. “माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं. या घरासाठी रक्ताचं पाणी केलं. आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम?” असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते. त्यानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अधिपती चारुहासला लग्न मान्य करण्यासाठी विनवणी करतांनाचे सांगत आहे. या प्रोमोमध्ये अधिपती वडिलांना असं म्हणतो की, “जे झालं ते झालं, आता सगळं विसरुन माफ करुया. तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी तरी… तुमच्या मुलासाठी तरी हे लग्न मान्य करा. कृपया या लग्नाला तयार व्हा आणि चारुलताबरोबर (भुवनेश्वरी) लग्न करा. इतकं तरी माझ्यासाठी करु शकता ना?”
मालिकेचा हा नवीन प्रोमो व्हायरल होत असून आता मालिकेत चारुहास चारुलताच भुवनेश्वरीच असल्याचे समजल्यानंतरही लग्न करण्यास तयार होणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत गेले काही दिवस चारुहास व अधिपती यांचे संबंध नीट नसल्याचे पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे आता लेकाचे प्रेम मिळवण्यासाठी भुवनेश्वरीचे सत्य माहीत झाल्यानंतरही तिच्याबरोबर लग्न करणार का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.