‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर ती रील स्टार म्हणून लोकप्रिय होतीच पण ‘बिग बॉस मराठी’मुळे तिच्या या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ पासून अंकिता कायमच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमलेली पाहायला मिळत आहे. कायम नाती जपणारी अशी तिची चाहत्यांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्याने सक्रीय झाली आहे. (Ankita Walawalkar Help Her Friend’s Sister)
अंकिता वालावलकर सोशल मीडियाद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमधून अंकिताने एका मित्राला मदत केली असून अंकिताच्या मदतीमुळे तिच्या मित्राला वैद्यकीय सहाय्य मिळाले आहे. अंकिताच्या एका मित्रासाठी तिने केईएम हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून दिला आहे आणि याबद्दल अंकिताच्या मित्राने तिचे कौतुकदेखील केलं आहे.

अंकिताच्या मित्राने तिचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “अंकिता बोलण्यासाठी शब्द नाहीत. माझ्या एका कॉलवर माझ्या बहिणीसाठी स्वतः गेलीस आणि तिला बेड मिळवून दिलास. मैत्रीत धन्यवाद बोलून तुला परक नाही करणार. पण तुझ्यासारखी एक जवळची मैत्रीण लाभली याचा मला नेहमी अभिमान राहील”. मित्राची ही स्टोरी अंकिताने रिशेअर केली आहे.

अंकिताने केईएम हॉस्पिटलमधील एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात एक गृहस्थ हॉस्पिटलमध्ये घाईघाईत चालतानाचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह तिने “मुलीला बेड मिळवा म्हणून वडिलांची तळमळ” असं लिहिलं आहे. तसंच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा विभाग आणि अॅम्ब्युलन्सचा फोटो शेअर केला आहे आणि “फक्त एका मुलीच्या वडिलांसाठी” असं लिहिलं आहे.
दरम्यान, अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर असण्याबरोबरच युट्यूबरदेखील आहे. युट्यूबवर ती तिचे व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. लवकरच ती लग्नबांधणार अकडणार असून तिच्या लग्नाची तिचे अनेक चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता अंकिताने मित्राला केलेल्या या मदतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.